राष्ट्रवादीच्या पक्ष मेळाव्यात गटबाजी; आगामी महापालिका निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र लढवावी - जयंत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 09:18 PM2021-10-24T21:18:54+5:302021-10-24T21:22:54+5:30

मीरा भाईंदर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा मीरारोडच्या तिवारी इंजिनिअरिंग महाविद्यालयात रविवारी झाला. जिल्हाध्यक्षपदी अंकुश मालुसरे यांच्या नियुक्तीवरून एक गट नाराज आहे.

Upcoming Municipal Elections should be fought together by Mahavikas Aghadi says Jayant Patil | राष्ट्रवादीच्या पक्ष मेळाव्यात गटबाजी; आगामी महापालिका निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र लढवावी - जयंत पाटील 

राष्ट्रवादीच्या पक्ष मेळाव्यात गटबाजी; आगामी महापालिका निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र लढवावी - जयंत पाटील 

Next


मीरा रोड -राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज रविवारी मीरा भाईंदरमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी काहींनी जिल्हाध्यक्षांसह इतरही काही मुद्द्यांवर तक्रारींचा सूर आळवल्याने शाब्दिक वादही झाल्याचे सूत्रांनी सांगितले. तर पुढील वर्षी होणारी महापालिका निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र लढवावी, अशी भूमिका पाटील यांनी मांडली.

मीरा भाईंदर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा मीरारोडच्या तिवारी इंजिनिअरिंग महाविद्यालयात रविवारी झाला. जिल्हाध्यक्षपदी अंकुश मालुसरे यांच्या नियुक्तीवरून एक गट नाराज आहे. २०१७च्या पालिका निवडणुकीवेळी मालुसरे यांनी पक्षाला दगा दिला होता. त्यांनी काही लोकांची फसवणूक केल्याच्या तक्रारी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत मांडण्यात आल्या होत्या. मालुसरे यांच्या नियुक्ती विरोधात विशेषतः माजी जिल्हाध्यक्ष संतोष तेंडुलकर व त्यांचे समर्थक सक्रिय आहेत. तर दुसरीकडे माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम यांनी राष्ट्रवादीत मालुसरे यांच्या आधी प्रवेश घेऊनदेखील त्यांना कोणती महत्त्वाची जबाबदारी दिली गेली नाही. त्या अनुषंगाने मालुसरे यांच्यासह स्थानिक राष्ट्रवादीतील गटबाजीबाबतचे पडसाद राष्ट्रवादीच्या मेळाव्यात उमटले. 

पक्षाच्या स्थानिक प्रवक्त्याने पत्रकारांना आमंत्रित केले असताना पक्षांतर्गत वाद उफाळून येऊ लागताच पत्रकारांना बाहेर जाण्याची विनंती प्रदेशाध्यक्षांना करावी लागली. पक्षांतर्गत कुरबुरी बाजूला ठेवून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. कार्यकर्त्यांच्या तक्रारींची नोंद घेतली असून त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे सांगतानाच पाटील यांनी पुरुष व महिला जिल्हाध्यक्ष बदलणार नसल्याचे संकेत दिले.

पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले की, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवावी, अशी आपली भूमिका आहे. शक्य नसल्यास एखाद्या सहकारी पक्षासोबत मिळून लढता येईल. 

भाजपच्या माजी आमदाराच्या क्लबमध्ये अनेक मोठ्या लोकांचा हात -
भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या वादग्रस्त सेव्हन इलेव्हन क्लब बाबत बोलताना पाटील म्हणाले,  विधानसभेत आपण हा मुद्दा उपस्थित केल्याचा परिणाम म्हणून शहरातील नागरिकांनी त्या आमदारास बदलून दुसऱ्याला निवडून दिले.  तपासात आपल्या समोर अनेक फाईल्स - कागदपत्रे आली. क्लबच्या बांधकाम परवानगीपासून ते त्याचे बांधकाम करण्यापर्यंत कांदळवन नष्ट करण्यासह अनेक कायदे, नियमांचे उल्लंघन केले गेले आहे व ते अतिशय गंभीर आहे. यात अनेक मोठ्या लोकांचा हात असल्याचा आरोप पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख टाळत केला.

Web Title: Upcoming Municipal Elections should be fought together by Mahavikas Aghadi says Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app