ठाण्यात दिव्यांग तरुणावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार
By जितेंद्र कालेकर | Updated: November 18, 2019 22:10 IST2019-11-18T22:06:09+5:302019-11-18T22:10:31+5:30
मानसिकरित्या विकलांग असलेल्या २२ वर्षीय तरुणावर कळवा येथील एका सलूनमधील मोनू शर्मा याने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी शर्माविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठार मारण्याचीही दिली धमकी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कळव्यातील भास्करनगर येथील एका सलूनच्या दुकानात २२ वर्षीय तरुणावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणा-या मोनू शर्मा (२४, रा. भास्करनगर, कळवा) याच्याविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या अत्याचाराच्या प्रकारानंतर तो पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मोनू याने १६ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते १० वाजण्याच्या सुमारास आपल्या सलूनच्या दुकानात दिव्यांग असलेल्या या २२ वर्षीय तरुणाला बोलविले. तिथे दुकानाचे शटर बंद करून त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. तसेच या प्रकाराबद्दल कुठेही वाच्यता केल्यास त्याला ठार मारण्याचीही धमकी दिल्याचे या तरुणाने त्याच्या पालकांना सांगितले. या प्रकाराची खात्री करण्यासाठी शर्माला पीडित तरुणाच्या पालकांनी जाब विचारला. तेव्हा त्याने या प्रकाराचा इन्कार करून त्याचे वडील आणि भावालाही धमकी दिली. पोलीस ठाण्यात तक्रार केली तरी आपण घाबरत नसल्याचे सांगून त्यांना पुन्हा आल्यास बघून घेण्याचीही त्याने पुन्हा धमकी दिली. या प्रकारानंतर भेदरलेल्या या कुटुंबाने १७ नोव्हेंबर रोजी याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात अनैसर्गिक अत्याचार आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विलास कदम याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.