उल्हासनगर मनपा शाळा क्रं-२४ व १८ ची आठ वर्षानंतर वाजणार घंटा
By सदानंद नाईक | Updated: February 18, 2025 14:00 IST2025-02-18T13:59:36+5:302025-02-18T14:00:54+5:30
उल्हासनगर महापालिका शाळेतील मुलांच्या संख्येत घट होत असताना, दुसरीकडे शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार उघड झाला.

उल्हासनगर मनपा शाळा क्रं-२४ व १८ ची आठ वर्षानंतर वाजणार घंटा
उल्हासनगर : पुर्नबांधणीच्या नावाखाली ८ वर्षांपूर्वी जमीनदोस्त केलेल्या महापालिका शाळा क्रं-२४ व १८ च्या इमारतीचे काम अवघ्या सव्वा वर्षात पूर्णतःवाकडे आले. या शैक्षणिक वर्षात शाळेची घंटा वाजणार असल्याचे संकेत शिक्षण विभागाने दिले असून शाळेसाठी समाजसेवक प्रा. प्रवीण माळवे यांनी पाठपुरावा केला होता.
उल्हासनगर महापालिका शाळेतील मुलांच्या संख्येत घट होत असताना, दुसरीकडे शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार उघड झाला. खेमानी येथील शाळा क्रं-२४ व १८ च्या पुर्नबांधणीच्या नावाखाली शाळा इमारत ८ वर्षांपूर्वी जमीनदोस्त केली. त्यामुळे शाळेतील हजारो मुलांना एका खाजगी शाळेच्या इमारतीच्या क्षेत्रछायाखाली शैक्षणिक धडे गिरविण्याची वेळ आली. मूळ शाळा व आता भरत असलेल्या शाळेचे अंतर मोठे असल्याने, अनेक गरीब व गरजू मुलांनी आर्थिक परिस्थिती अभावी शाळेला कायमचा रामराम ठोकला. असी चर्चा परिसरात आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून यावर्षी शाळेची घंटा वाजणार असल्याचे संकेत शिक्षण विभागाने दिले. ४ मजली शाळेची इमारत पूर्णतः वाकडे आली असून दोन्ही शाळेत ८५० पेक्षा जास्त मुले शिक्षण घेत आहेत.
महापालिका शाळा येणाऱ्या शैक्षणिक वर्षांपासून सुरू होण्यासाठी अनेकांनी पाठपुरावा केला असून सामाजिक संघटना व मुलांच्या पालकांनी शाळा सुरू होण्यासाठी अनेकदा आंदोलनही केली. अखेर डिसेंबर २०२३ मध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन झाल्यावर, अवघ्या सव्वा वर्षात चार मजली इमारत उभी राहिली असून यावर्षी शाळा सुरूकरण्याचे संकेत शिक्षण विभागाने दिले. नवनियुक्त आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी नुकतीच महापालिका शाळेचा दौरा करून मुलांची शैक्षणिक प्रगती स्वतः बघितली आहे. खेमानी येथील शाळा इमारतीचा दौरा आयुक्तानी करून, या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्यावर भर द्यावा. या मागणीने जोर पकडला आहे.