उल्हासनगर महापालिका अभ्यासिकेची आयुक्ताकडून पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 19:44 IST2025-07-09T19:43:50+5:302025-07-09T19:44:05+5:30
यावेळी दिव्यांग विभागाचे उपायुक्त अनंत जवादवार व दिव्यांग विभाग प्रमुख राजेश घनघाव उपस्थित होते.

उल्हासनगर महापालिका अभ्यासिकेची आयुक्ताकडून पाहणी
उल्हासनगर : कॅम्प नं-३, सी ब्लॉक परिसरात बांधलेल्या डॉ आंबेडकर अभ्यासिका व दिव्यांग कल्याणकारी योजना विभागाने सुरू केलेल्या फिजिओथेरपी सेंटरची पाहाणी आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी केली. यावेळी दिव्यांग विभागाचे उपायुक्त अनंत जवादवार व दिव्यांग विभाग प्रमुख राजेश घनघाव उपस्थित होते.
उल्हासनगर महापालिकेने कॅम्प नं-३, फॉरवर्ड लाईन जवाहर हॉटेल जवळ अद्यावत डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका बांधली आहे. अभ्यासिकेतून युपीएससी, एमपीएससी व विविध स्पर्धा परीक्षेत अनेक विध्यार्थी उत्तीर्ण झाले. नागरिकांच्या मागणीनुसार महापालिकेने सीब्लॉक परिसरात पुन्हा अभ्यासिका बांधली असून त्याची पाहणी आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी केली. तसेच दिव्यांग विभागाच्या वतीने सुरु केलेल्या फिजिओथेरपी सेंटरची पाहणीही आयुक्तानी केली. मे २०२५ पासुन सुरू केलेल्या फिजिओथेरपी सेंटर मध्ये आतापर्यंत १०७ दिव्यांगांनी फिजिओथेरपीचा लाभ घेतला. सेंटर मध्ये मोफतपणे शारीरिक चिकित्सा, व्यावसायीक चिकित्सा, वाणी आणि भाषा चिकित्सा, मनोवैज्ञानिक सल्लागार, योगा थेरपी, दैनिक जीवनातील क्रिया, नर्सिंग देखभाल, पालकांचे प्रशिक्षण आणि समुपदेशन अशा विविध प्रकारच्या थेरपी दिल्या जातात. महापालिकेच्या वतीने प्रथमच मोफत फिजिओथेरपीची सोय निर्माण करून देण्यात आली आहे.
उल्हासनगरातील दिव्यांगानी जास्तीत जास्त प्रमाणात याचा फायदा घ्यावा असे आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी आवाहन केले. दरम्यान सी ब्लॉक येथील अभ्यासिका, मध्यवर्ती पोलीस ठाणे शेजारी बांधण्यात आलेले अग्निशमन दलाचे नवीन कार्यालय, खेमानी येथे बांधलेली शाळा इमारत उदघाट्नच्या प्रतीक्षेत असून या महिन्यात तिन्ही वास्तूचे उदघाट्न होण्याचे संकेत महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहे.