कोलशेतमधील दोन अल्पवयीन मुली सापडल्या पुण्यात; आईवडील रागावतात म्हणून मुलींनी सोडले होते घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 14:24 IST2026-03-16T14:24:32+5:302026-03-16T14:24:43+5:30
कोलशेत भागातून ७ मार्च रोजी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. त्या कोलशेत येथील एका कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात शिकतात. दोघींपैकी एकीच्या रिक्षाचालक असलेल्या वडिलांनी तिला ७ मार्च रोजी सकाळी पावणेसातच्या सुमारास महाविद्यालयात सोडले. पुन्हा तिला सकाळी ११ वाजता महविद्यालयात घेण्यास गेल्यानंतर त्यांना मुलगी दिसली नाही.

कोलशेतमधील दोन अल्पवयीन मुली सापडल्या पुण्यात; आईवडील रागावतात म्हणून मुलींनी सोडले होते घर
जितेंद्र कालेकर -
ठाणे : आई-वडील रागावतात, आपसात नेहमीच भांडतात, या प्रकाराला कंटाळून कोलशेत भागातून १५ आणि १६ वर्षीय दोन मुलींनी घर सोडले होते. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटच्या पथकाने तीन दिवसांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले.
कोलशेत भागातून ७ मार्च रोजी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. त्या कोलशेत येथील एका कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात शिकतात. दोघींपैकी एकीच्या रिक्षाचालक असलेल्या वडिलांनी तिला ७ मार्च रोजी सकाळी पावणेसातच्या सुमारास महाविद्यालयात सोडले. पुन्हा तिला सकाळी ११ वाजता महविद्यालयात घेण्यास गेल्यानंतर त्यांना मुलगी दिसली नाही.
महाविद्यालयातही ती गेली नसल्याचे चौकशीत समोर आले. त्यांच्याच मित्राची मुलगी असलेली तिची मैत्रीणही बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले. त्या सापडल्या त्यावेळी आईवडिलांची भांडणे आणि त्यांचे रागावणे, आदी कारणामुळे कुटुंबीयांना माहिती न देताच घर सोडल्याची कबुलीही त्यांनी
पोलिसांना दिली.
लोकेशनच्या आधारे शोध
बेपत्ता दोघींचाही परिसरात शोध घेऊनही त्या न सापडल्याने या गंभीर प्रकाराबाबत अपहरणाचा संशय व्यक्त करीत त्यांनी ८ मार्च रोजी कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
कापूरबावडी पोलिसांबरोबरच गुन्हे अन्वेषण विभागानेही या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला. दोघींपैकी एकीकडे मोबाइल असल्याने लोकेशनच्या आधारे त्यांचा तपास सुरू केला.
पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव आणि वागळे इस्टेट युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सलील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पल्लवी ढगे-पाटील, पोलिस हवालदार मीनाक्षी मोहिते, तेजस ठाणेकर आणि जगताप, आदींच्या पथकाने १० मार्च रोजी त्यांचा पुणे परिसरातून शोध घेतला.
कर्जत स्थानकात काढली रात्री
पळून गेल्यानंतर सुरुवातीला त्यांनी ठाण्यातून कर्जत रेल्वे स्थानक गाठले. तिथे रात्र काढल्यानंतर पुणे गाठले.
आई-वडिलांकडून मिळणाऱ्या खाऊच्या पैशांमधून त्यांनी पुण्यातच स्वत:साठी मनसाेक्तपणे खाण्याचे पदार्थ घेतले. त्यानंतर सोलापूरमधील एका नातेवाइकांकडे जाण्याच्या बेतात असतानाच पाेलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.