बदलापूरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कारला भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर पाच जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 17:53 IST2019-01-30T17:52:47+5:302019-01-30T17:53:34+5:30
बारवी डॅम रोडवरुन येत असतांना सोनावळे गावाजवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कारला भीषण अपघात झाला.

बदलापूरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कारला भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर पाच जण जखमी
बदलापूर - बारवी डॅम रोडवरुन येत असतांना सोनावळे गावाजवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात एक तरुण आणि एक तरुणी अशा दोघांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले. या अपघातात जखमी झालेल्या पाचही तरुणांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
उल्हासनगर येथील एस.एस.टी महाविद्यालयातील 9 विद्यार्थी हे फिरण्यासाठी बारवी डॅम परिसरात गेले होते. यावेळी भरधाव वेगाने गाडी चालवित असतांना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही गाडी सोनावळे गावाजवळील वळणावर उलटली. गाडीचा वेग जास्त असल्याने गाडी तीन ते चार वेळा उलटली. त्यामुळे या गाडीतील नुपम तायडे(18) आणि रुतिका कदम (18) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले इतर सात जणांपैकी पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. तर उर्वरित दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. गंभीर जखमींना लागलीच उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजणक असल्याने त्यांना मुंबईच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.