पालघरमध्ये मालगाडीच्या धडकेत तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 13:44 IST2026-03-15T13:43:27+5:302026-03-15T13:44:00+5:30
पालघर पूर्वेतील वीरेंद्रनगरातील तीन तरुणांना गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या एका मालगाडीने पालघरच्या जैन मंदिराजवळ उडवले...

पालघरमध्ये मालगाडीच्या धडकेत तिघांचा मृत्यू
हितेन नाईक -
पालघर : मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना पालघरच्या जैन मंदिराजवळ घडली. मात्र, साध्या वेशातील पोलिसांनी शुक्रवारी (दि. १३) रात्री पाठलाग केल्याने घाबरून पळताना अपघात होऊन तिघांचा बळी गेल्याचा आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केला आहे.
पालघर पूर्वेतील वीरेंद्रनगरातील तीन तरुणांना गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या एका मालगाडीने पालघरच्या जैन मंदिराजवळ उडवले. या अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. यापैकी एका तरुणाच्या नावावर पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, या तरुणांचा पाठलाग करणारे लोहमार्ग पोलिस, आरपीएफ पोलिस होते की पालघर शहर पोलिस होते? याबाबत कुठलीच माहिती समोर आलेली नाही. या घटनेप्रकरणी आकस्मिक गुन्ह्याची नोंद पालघर लोहमार्ग पोलिस ठाण्यात करण्यात आलेली आहे. पोलिसांनी या तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत. स्वप्निल शैलेश पलांडे (२३), कुणाल कुमार दुबळा (२३) आणि अफरोज खलील शेख (२८) अशी या तिघांची नावे आहेत.
पोलिस काय म्हणाले?
इफ्तारी करून तिघे विरेंद्रनगर येथील घरी जाताना जैन मंदिराजवळील एका भिंतीमधील फटीमधून रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना या तिघांचा अपघात झाल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक यांनी ‘लोकमत’ला दिली. तपासासाठी सीसीटीव्ही तपासले जात असल्याचेही ते म्हणाले. तर लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगवले यांनी माहिती दिली, रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या मालगाडीने या तिघांना उडविल्याचे मालगाडीच्या लोको पायलटने सांगितले.
मृतांच्या नातेवाइकांची मागणी काय?
हे तिन्ही तरुण एखाद्या गुन्हेगारी प्रकरणात सहभागी होती का? त्यांचा पाठलाग कोणते पोलिस आणि कशासाठी करीत होते? याची माहिती समोर यावी, अशी मागणी एका मृताची बहीण दर्शना सुरेश सिंग यांनी केली.