गांजाची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक; ३७ लाखांचा ७४ किलाे गांजा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 18:20 IST2025-07-04T18:19:08+5:302025-07-04T18:20:10+5:30
ठाणे गुन्हे शाखेच्या भिवंडी युनिटची कामगिरी: घराच्या पडवीमध्येही मिळाला गांजा

गांजाची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक; ३७ लाखांचा ७४ किलाे गांजा जप्त
लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: गांजाची तस्करी करणाऱ्या फैजल अन्सारी (४४) याच्यासह तिघांना अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पाेलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी शुक्रवारी दिली. या आराेपींकडून ३७ लाख ३७ हजार ४०० रुपयांचा ७४ किलाे ५४८ ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत केला आहे.
भिवंडीतील माेमीनबाग दर्गा राेड भागात अन्वर अन्सारी याच्या घराजवळ फैजल हा गांजाच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती भिवंडी युनिटचे वरिष्ठ पेालीस निरीक्षक जनार्दन साेनवणे यांना मिळाली हाेती. त्याच माहितीच्या आधारे ३ जुलै २०२५ राेजी राेजी उपायुक्त जाधव आणि सहायक पाेलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली साेनवणे यांच्यासह सहायक पाेलीस निरीक्षक धनराज केदार, श्रीराज माळी आणि उपनिरीक्षक रवींद्र पाटील यांच्या पथकाने सापळा रचून फैजल याच्यासह अब्दुल अन्सारी (२०) आणि अन्वर अन्सारी या तिघांना अटक केली.
फैजल आणि अब्दुल यांच्या अंगझडतीमध्ये तसेच अन्वर याच्या भिवंडीतील माेमीनबाग दर्गा राेड येथील घराच्या पडवीमध्येही असा ७४ किलाे ५४८ ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी भाेईवाडा पाेलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टाेळीने हा गांजा काेणाकडून आणला? त्यांचे आणखी काेण काेण यात साथीदार आहेत, याचाही तपास करण्यात येत असल्याचे उपायुक्त जाधव यांनी सांगितले.