उल्हासनगरात जेलमधून बाहेर आलेल्यावर गोळीबार करणारे तिघे जेरबंद, गावठी कट्टाही हस्तगत
By सदानंद नाईक | Updated: November 25, 2025 21:32 IST2025-11-25T21:31:41+5:302025-11-25T21:32:11+5:30
मध्यवर्ती पोलिसांनी तपासाचे चक्र जलद फिरवीत मोहित हिंदुजा, धीरज पारवानी व कृष्णा राजपूत यांना अटक केली. तर फरार इतर आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

उल्हासनगरात जेलमधून बाहेर आलेल्यावर गोळीबार करणारे तिघे जेरबंद, गावठी कट्टाही हस्तगत
उल्हासनगर: शिक्षा भोगून जेलमधून बाहेर आलेल्या सचिन उर्फ बाहुजी बहादूर करोतिया याच्यावर गेल्या शुक्रवारी रात्री गोळीबार करणाऱ्या टोळक्या पैकी मोहित हिंदुजा, धीरज पारवानी व कृष्णा राजपूत यांना पोलिसांनी अटक केली. गोळीबार प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
उल्हासनगर कॅम्प नं-३, इमलीपाडा येथील गोगाजी मंदिर येथे गेल्या शुक्रवारी २१ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास शिक्षा भोगून आलेला सचिन उर्फ बाहुजी बहादूर करोतिया हा मित्रासोबत उभा असताना दोन मोटरसायकलींवरून आलेल्या सहा जणांच्या टोळक्यातील मोहित हिंदुजा नावाच्या तरुणांनी करोतिया याच्या दिशेने दोन राऊंड शूट केले होते. तर दोन राऊंड खाली पडले. यावेळी त्यांनी परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने करोतियाला कोणतीही दुखापत झाली नसल्याने, मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर मध्यवर्ती पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून मोहित हिंदुजा यांच्यासह अन्य जणावर गुन्हा दखल झाला होता.
मध्यवर्ती पोलिसांनी तपासाचे चक्र जलद फिरवीत मोहित हिंदुजा, धीरज पारवानी व कृष्णा राजपूत यांना अटक केली. तर फरार इतर आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांच्याकडून ऐक गावठी कट्टा हस्तगत केला असून गावठी कट्टा कुठून आणला. याबाबत पोलीस शोध घेत आहेत. आरोपी मोहित हिंदुजा याच्या भावा सोबत करोतिया याचा वाद झाल्याच्या रागातून गोळीबार केल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले. करोतिया याच्यावर विविध पोलीस ठाण्यात ५ गुन्हे दाखल असून मोहित हिंदुजा याच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच इतर आरोपीही गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.