शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 07:01 IST2025-12-06T06:58:59+5:302025-12-06T07:01:06+5:30
या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आल्याने पुराव्याच्या अनुषंगाने राज्य सरकार व महापालिका आता तरी कारवाई करणार का? असा प्रश्न मराठी एकीकरण समितीने केला

शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
मीरा रोड : भाईंदर पश्चिमेस एका विकासकाच्या बांधकाम प्रकल्पात घर खरेदीसाठी गेलेल्या काँग्रेसच्या मराठी पदाधिकाऱ्यास शाकाहारी नसल्यामुळे फ्लॅट नाकारला. या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आल्याने पुराव्याच्या अनुषंगाने राज्य सरकार व महापालिका आता तरी कारवाई करणार का? असा प्रश्न मराठी एकीकरण समितीने केला आहे.
भाईंदर पश्चिम उड्डाणपुलाखालील रेल्वे समांतर मार्गालगत श्री स्कायलाइन नावाने बांधकाम प्रकल्प सुरू आहे. तो रेरामध्ये नोंदणीकृत आहे. काँग्रेस प्रवक्ते रवींद्र बाबासाहेब खरात हे सहकारी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सिद्धेश राणे यांच्यासह फ्लॅट खरेदी करण्यासाठी बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी गेले होते.
विकासकाच्या बुकिंग कार्यालयातील कर्मचाऱ्याने खरात यांच्याशी चर्चा केल्यानंतर शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट दिला जाईल, असे स्पष्टपणे सांगितले. संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, समाजकल्याणमंत्री, महरेरा, ठाणे जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांना पाठवून तक्रार केली आहे.