चारित्र्याचा संशय आला अन् माजी महापौराच्या भावाने बायकोला उडवले; कळव्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 06:59 AM2023-09-03T06:59:41+5:302023-09-03T06:59:58+5:30

हत्येनंतर पतीचाही धक्क्याने मेंदूत रक्तस्राव होऊन मृत्यू

The character was suspected and the former mayor's brother dumped his wife | चारित्र्याचा संशय आला अन् माजी महापौराच्या भावाने बायकोला उडवले; कळव्यातील घटना

चारित्र्याचा संशय आला अन् माजी महापौराच्या भावाने बायकोला उडवले; कळव्यातील घटना

googlenewsNext

ठाणे : कळव्यातील बांधकाम व्यावसायिक दिलीप साळवी (५७) यांनी चारित्र्याच्या संशयावरून पत्नी प्रमिला साळवी (५२) हिच्यावर गोळी झाडून तिची हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री १० ते १०:३० च्या सुमारास घडली. या गोळीबारानंतर काही अंतराने दिलीप यांचाही मेंदूतील रक्तस्रावाने मृत्यू झाला. 

ठाण्याचे माजी महापौर गणेश साळवी यांचे दिलीप हे मोठे बंधू आहेत. त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली. कुंभारआळीतील साळवी यांच्या बंगल्यात हे थरारनाट्य घडले. दिलीप आणि त्यांची पत्नी प्रमिला यांच्यात काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. त्यात दिलीप पत्नीच्या चारित्र्यावरही संशय घेत होते, अशी माहिती दिलीप यांचा मुलगा प्रसाद (२५) याने पोलिसांना दिली. घरातील हॉलमध्ये त्यांच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून त्यांनी गोळीबार केला. या आवाजाने परिसरातील रहिवासी जमले होते. त्यांनी याची माहिती   कळवा पोलिसांना दिली.

रक्ताच्या थारोळ्यात 
घरात पती-पत्नी दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने दिलीप यांनीही स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली असावी, असे चित्र सुरुवातीला पोलिसांनाही दिसले. मात्र, तपासणीमध्ये त्यांच्यावर गोळीबार किवा कुठेही जखमा नसल्याचे कळवा पोलिसांनी सांगितले.

पती चिडखोर आणि व्यसनी

दिलीप हे नेहमीच चिडायचे, आरडाओरडाही करायचे. त्यांना दारूचेही व्यसन होते, अशी माहिती पाेलिसांच्या चाैकशीत पुढे  आली आहे. 
घटनास्थळी ठाण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त महेश पाटील, पोलिस उपायुक्त गणेश गावडे, सहायक पोलिस आयुक्त विलास शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात आणि उपनिरीक्षक दीपक घुगे आदींनी भेट देऊन पाहणी केली. दोन्ही मृतदेहांची कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. दिलीप यांचा मृत्यू घटनेनंतर बसलेल्या धक्क्याने मेंदूमध्ये झालेल्या रक्तस्रावाने (ब्रेन हॅमरेज) झाल्याचे  शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे. 

बांधकाम व्यावसायिक दिलीप साळवी आणि त्यांच्या पत्नीमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होते. त्यात पत्नीच्या चारित्र्यावरही ते संशय घेत होते. हेही वादाचे एक कारण होते, अशी माहिती मुलाने आपल्या तक्रारीमध्ये दिली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.- गणेश गावडे,  पोलिस उपायुक्त, ठाणे शहर

Web Title: The character was suspected and the former mayor's brother dumped his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.