"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 16:14 IST2025-10-16T16:10:02+5:302025-10-16T16:14:31+5:30
पूर्वी युती झाली नाही त्यामुळे आम्ही गाफील असणार नाही. भाजपाचा महापौर ठाणे महापालिकेत होण्यासाठी पक्ष निश्चितपणे कार्यकर्त्याच्या इच्छेनुसार काम करेन असं आमदार संजय केळकर यांनी सांगितले.

"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
ठाणे - आम्ही गाफील नाही. ठाणे जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढली आहे. सर्वाधिक आमदार भाजपाचे आहेत. त्यामुळे स्वबळावर लढण्याची वेळ आली तरी आमची तयारी आहे असं विधान भाजपा आमदार संजय केळकर यांनी केले आहे. शिंदेसेनेसोबत युतीवर केळकर यांनी हे भाष्य केले. आज ठाण्यात भाजपाने इच्छुकांच्या मुलाखती, कार्यकर्त्यांचे परिचय पत्रक भरून घेतले. त्यात वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी संजय केळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, प्रत्येक पक्ष निवडणुकीची तयारी करत असतो. जेव्हा निवडणूक लागते तेव्हा भाजपा कार्यकर्त्यांची शाळा घेत असते. आज ५०० कार्यकर्त्यांकडून परिचय पत्रक घेण्यात आले. अनेक जण बाहेरून पक्षात आलेत. त्यांची माहिती होण्यासाठी पत्रक घेतले. आज कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. गेल्या २० वर्षात अनेक वेळा युती जमली नाही. एकाबाजूला युतीत लढण्याची आमची तयारी आहे म्हटले जाते, दुसरीकडे जागावाटपात अनेक प्रश्न उपस्थित राहतात. त्यामुळे आम्ही कायम तयारीत असणारी संघटना आहोत. ३६५ दिवस आम्ही तयारी करत असतो. सर्व ठिकाणी लढण्याची वेळ आली तर ती तयारी असली पाहिजे असं त्यांनी सांगितले.
तसेच भाजपाची ठाणे जिल्ह्यात ताकद वाढली आहे. सर्वात जास्त आमदार भाजपाचेच आहेत. ज्या ज्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान, त्यांचा हक्क आणि जनतेच्या समस्या सोडवण्याची वेळ येते तेव्हा आम्ही तिथेच जातो. तिथे कुणाची जाहागिरी नसते. जनता यावेळी योग्य ते ठरवलेले दिसणार आहे. कुणाची उंची किती याचे उत्तर योग्य वेळेला देऊ. आम्ही सगळ्या प्रभागात तयार आहोत. त्यादृष्टीने बैठका सुरू आहे. पूर्वी युती झाली नाही त्यामुळे आम्ही गाफील असणार नाही. भाजपाचा महापौर ठाणे महापालिकेत होण्यासाठी पक्ष निश्चितपणे कार्यकर्त्याच्या इच्छेनुसार काम करेन. प्रत्येक पक्षाची भूमिका असते. आम्ही आमचा महापौर बसेल हे सांगितले आहे. योग्य वेळेला जेव्हा कार्यकर्त्यांचा गिअर पडेल तेव्हा निर्णय घेतला जाईल असं भाष्य केळकर यांनी शिंदेसेनेसोबतच्या युतीवर केले.
दरम्यान, सगळ्या वयोगटात, सगळ्या समाजाला प्रतिनिधित्व देण्याची तयारी भाजपाची असते. विधानसभेला १३७ आमदार आहेत ते सगळ्या घटकातील आहे. आमची भूमिका सबका साथ, सबका विश्वास असे आहे. आम्ही वाट पाहत बसणार नाही. जिथे योग्यता असेल तिथे संधी दिली जाईल. आजही अनेकजण पक्षात येत आहेत. निवडून येण्याची काय शक्यता असते, त्या हिशोबाने सामुहिकपणे पक्षातील वरिष्ठ नेते निर्णय घेतील. निवडणुकीची चाचपणी सुरू आहे. बैठकीत चर्चा होत असते. आम्ही चौकीदार म्हणून महापालिकेत जे जे चुकीचे आहे त्याविरोधात आम्ही लढत राहिलो आहे असंही आमदार संजय केळकर यांनी सांगितले.