डोंबिवली - गणेशमूर्तीच्या विक्रीकरिता दिलेली सूट आणि क्षमतेपेक्षा जास्त मूर्ती घडविण्यात आलेले अपयश यामुळे पलायन केलेला मूर्तिकार प्रफुल्ल तांबडे (२८) याला विष्णूनगर पोलिसांनी बुधवारी अटक केली. मूर्ती वेळेवर तयार न केल्याने त्याला काही गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या प्रफुल्ल याने साताऱ्यात पलायन केल्याची माहिती चौकशीत उघड झाली आहे.
तांबडे याने पश्चिमेकडील चिनार मैदानात आनंदी कला केंद्र सुरू केले होते. गणेशमूर्तीच्या किमतीत सूट देऊन त्याने मोठ्या प्रमाणात ऑर्डर घेतल्या. परंतु, त्या वेळेत पूर्ण न झाल्याने ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. भीतीने गणेशोत्सव काही तासांवर आला असताना तांबडे सोमवारी रात्री पसार झाला. तांबडे पसार झाल्याची माहिती मिळताच विक्री केंद्रावर सोमवारी मध्यरात्री ग्राहकांनी धाव घेऊन हाताला लागेल ती गणेशमूर्ती घेऊन गेले. हा सिलसिला मंगळवारी रात्रीपर्यंत सुरू होता. विष्णूनगर पोलिसांनी तांबडे विरोधात गुन्हा नोंदवत त्याचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले. तांबडेने सोमवारी रात्री केंद्रातून पलायन करत सातारा गाठले. ही माहिती त्याच्या नातेवाईकांनीच पोलिसांना दिली.