ठाण्यात मनसे-फेरीवाल्यांमध्ये धक्काबुक्की
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 21:19 IST2018-09-07T20:20:44+5:302018-09-07T21:19:12+5:30
मनसे कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून फेरीवाल्यांनी तेथून पळ काढला.

ठाण्यात मनसे-फेरीवाल्यांमध्ये धक्काबुक्की
ठाणे : ठाण्यामध्ये फेरीवाल्यांविरोधात मनसे पुन्हा आक्रमक झाली असून फेरीवाल्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार आज रात्री घडला आहे. मनसे कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून फेरीवाल्यांनी तेथून पळ काढला.
ठाणे स्थानकाला फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. वर्षभरापूर्वी पालिका आयुक्तांनी जोरदार कारवाई करत ठाणे स्थानक फेरीवालामुक्त केले होते. मात्र, पुन्हा फेरीवाल्यांनी परिसरात ठाण मांडल्याने ठाणेकरांचे येणे-जाणे त्रासाचे बनले होते.
या फेरीवाल्यांविरोधात आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत हुसकावून लावले. या फेरीवाल्यांनी स्थानकाच्या आवारातील स्वच्छतागृहांमध्ये साहित्य लपवले होते. तेही पकडून दिले. यावेळी फेरीवालांना धक्काबुक्कीही झाली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांसोबत परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांना पाहून फेरीवाल्यांनी साहित्य स्वच्छतागृहामध्ये लपविले. पालिकेविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल करण्याचा इशारा मनसेच्या नेत्यांनी दिला.