ठाणे आरपीएफ पोलिसांमुळे रेल्वे प्रवासात गहाळ झालेली लॅपटॉपची बॅग पुन्हा मिळाली सुखरुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 00:20 IST2021-02-01T00:19:16+5:302021-02-01T00:20:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : टिटवाळा उपनगरी रेल्वेमध्ये अमृता कवठणकर (२६) या महिलेची लॅपटॉप असलेली बॅग गहाळ झाल्याची माहिती ...

रेल्वेच्या हेल्पलाईनवर मागितली होती मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: टिटवाळा उपनगरी रेल्वेमध्ये अमृता कवठणकर (२६) या महिलेची लॅपटॉप असलेली बॅग गहाळ झाल्याची माहिती ठाणेरेल्वे सुरक्षा दलाच्या जवांनाना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने या बॅगेचा शोध घेऊन कवठणकर यांना शनिवारी सुपूर्द केल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (सीएसएमटी) स्थानक येथे ३० जानेवारी रोजी सकाळी ११.२४ वाजताच्या टिटवाळा मार्गावरील धीम्या उपनगरी रेल्वेतील महिलांच्या बोगीमध्ये महिला प्रवाशाची लॅपटॉप असलेली बॅग विसरल्याची माहिती ठाणे स्थानकातील आरपीएफच्या पोलिसांना मिळाली. रेल्वेच्या १८२ या हेल्पलाईन क्रमांकावरुन ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक नवीन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली महिला अंमलदार सुजाता मालवीय यांनी या बॅगेचा शोध सुरु केला. संबंधित टिटवाळा उपनगरी रेल्वे दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी ठाणे स्थानकात आली. त्यावेळी या रेल्वेमध्ये ही काळया रंगाची बॅग मालवीय यांना मिळाली. बॅग मिळताच मुंबईतील बँकेत लेखाधिकारी असलेल्या अमृता कवठणकर (२६) यांना पाचारण करुन लॅपटॉप आणि पेन ड्राईव्हसह ही बॅग ओळख पटवून त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
* कवठणकर या शनिवारी दिवा ते सीएसएमटी असा प्रवास करीत होत्या. सकाळी ११.०८ वाजता त्यांची उपनगरी रेल्वे सीएसएमटी स्थानकात पोहचली. त्यावेळी लॅपटॉपची बॅग न घेताच त्या रेल्वेतून उतरल्या. त्यानंतर हीच उपनगरी रेल्वे टिटवाळयाकडून ११.२४ ला तिथून सुटल्यानंतर त्यांनी ही माहिती रेल्वेच्या हेल्पलाईनवर देऊन मदतीची मागणी केली. ही माहिती मिळताच ठाणे आरपीएफकडून त्यांना सकारात्मक मदत मिळाल्याने त्यांनी सिंग यांच्यासह त्यांच्या पथकाचे आभार मानले.