Thane Rain Video: मुंबईबरोबरच ठाणे शहर आणि जिल्ह्यात प्रचंड पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून, ठाण्यातील रस्त्यांच्या नाकातोंडात पाणी गेले आहे. नागरिकांना रस्त्यावरून वाहने चालवणे कठीण झाले असून, त्यातच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ठाण्यातील एका भुयारी मार्गात एक कार अडकली. त्यात दोन लोक अडकले होते. त्यांची मृत्यूच्या दाढेतून सुटका करण्यात यश आले.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ ठाणे शहरातील अंडरपास खालील आहे. भुयारी मार्ग पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे आणि एक कार त्यात अडकली आहे. कार एका बाजूने पाण्यावर तरंगली आहे. तर बोनेट पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे. उपवन तलाव भरल्याने भुयारी मार्गात पाणी भरले आहे.
दोघे मरता मरता वाचले
कार पाण्यात अडकली होती. दोघे जण कारमध्ये अडकले. भुयारी मार्गाबाहेर असलेल्यांच्या नजरेस ही घटना पडली. काही जण पोहत कारजवळ गेले. त्यांनी कारमध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यातील एकजण कारच्या मागील बाजूने वर चढला. छताला हात लावून त्याने कार खाली दाबली. त्यानंतर कारचे बोनट वरच्या दिशेने आले. कार समांतर झाल्यानंतर कारमधील दोघे गाडीच्या दारातून बाहेर पडले.
कारमधून दोघांना बाहेर काढतानाचा व्हिडीओ
हा भुयारी मार्ग ठाण्यातील नारीवली आणि उत्तरशिव या गावांना जोडतो. मात्र, मुसळधार पावसामुळे तो पूर्णपणे भरला आहे. ठाणे शहर आणि जिल्ह्यात अतिशय मुसळधार पाऊस सुरू असून, नागरिकांना कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात आहे. त्याचबरोबर धोकादायक मार्गावरून प्रवास टाळावा असेही सांगितलं जात आहे.
ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा
मागील पाच-सहा दिवसांपासून ठाणे शहर, जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. मंगळवारी पहाटेपासूनच ठाणे जिल्ह्यात पावसाचा जोर खूप वाढला होता. त्यामुळे याचा परिणाम लोकल रेल्वे सेवेवरही झाला आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील काही रुळ पाण्याखाली गेले आहेत. त्याचबरोबर सीएसएमटीकडे जाणारी आणि येणारी लोकल रेल्वे सेवाही रद्द केली गेली.
ठाण्यातील रस्ते वाहतुकही प्रचंड मंदावली आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांना सुरक्षित स्थळी हलवले गेले आहे. महापालिकेकडूनही मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.