महापालिकेची यंत्रणा रात्रभर रस्त्यावर; खड्डे भरण्याचं काम युद्धपातळीवर सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 04:19 PM2018-08-29T16:19:01+5:302018-08-29T16:19:38+5:30

पालकमंत्री, आयुक्तांनी केली पहाटे ३ पर्यंत पाहणी

thane municipal corporations starts filling potholes at midnight | महापालिकेची यंत्रणा रात्रभर रस्त्यावर; खड्डे भरण्याचं काम युद्धपातळीवर सुरू

महापालिकेची यंत्रणा रात्रभर रस्त्यावर; खड्डे भरण्याचं काम युद्धपातळीवर सुरू

ठाणे: खड्ड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि श्री गणेशाचे आगमन खड्डेमुक्त रस्त्यांतून होण्यासाठी ठाणे महापालिकेने कंबर कसली आहे. काल रात्रीपासून खड्डे भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पहाटे ३ वाजेपर्यंत या कामाची पाहणी केली.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील खड्डे भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु संततधार पाऊस आणि अवजड वाहतूक यामुळे परत खड्डे पडत आहेत. दिवसा खड्डे भरताना वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रात्रीच्यावेळी खड्डे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कालपासून महापालिकेची संपूर्ण यंत्रणा रात्री रस्त्यावर उतरली आहे. वाहतूक पोलीस शाखेच्या समन्वयातून रात्री खड्डे भरण्याची कार्यवाही युद्ध पातळीवर सुरू आहे. 

रात्री खड्डे भरण्यासाठी वरिष्ठ अभियंत्यांची विविध पथके निर्माण करण्यात आली असून त्यांच्या निगराणीखाली खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत काल रात्री आनंदनगर नाका, तीन हात नाका पूल, नितीन कंपनी पूल, कॅसल मिल, मानपाडा जंक्शन, दोस्ती इंपिरिया, ब्रम्हांड, कोलशेत, ढोकाळी नाका, श्रीरंग सोसायटी, एसटी कार्यशाळा, खारटन रोड, मल्हार सिनेमा चौक या ठिकाणी खड्डे बुजवण्याचे काम पहाटेपर्यंत सुरू होते. 

तीन दिवस चालणार विशेष मोहीम
शहरातील खड्डे बुजवण्याची विशेष मोहीम तीन दिवस चालणार आहे. या तीन दिवसात रात्रीच्यावेळी जास्तीत जास्त खड्डे बुजवण्याच्या सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्या असून महापालिका आयुक्त स्वत: रात्री या कामाची पाहणी करणार आहेत.

पालकमंत्र्यांनी केले आयुक्तांचे कौतुक
खड्डे बुजवण्याच्या बाबतीत ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल करत असलेल्या कामाचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. विशेष म्हणजे महापालिकेच्या मालकीचे रस्ते नसतानाही केवळ वाहतूक कोंडी टळावी आणि नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी आयुक्त प्रयत्न करत आहेत, असे शिंदे म्हणाले. 
 

Web Title: thane municipal corporations starts filling potholes at midnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.