Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 17:55 IST2026-04-08T17:53:13+5:302026-04-08T17:55:27+5:30
Kalyan Railway Accident: अंबरनाथ ते बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान एका व्यक्तीने लोकल रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. पत्नीसोबत वाद झाल्यानंतर व्यक्तीने आयुष्य संपवले.

Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
पत्नी, मुलगा, आई आणि बहिणीसोबत एकत्र राहत असलेल्या एका व्यक्तीने लोकल रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ३ एप्रिल रोजी घडली. मात्र, प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यानंतर उघडकीस आले. रविकांत अडांगळे (वय ४९) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
रविकांत अडांगळेचे पत्नीसोबत सातत्याने वाद सुरू होते. पत्नीची आई आणि बहीणही त्याला त्रास देऊ लागली होती, असा आरोप सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे. कल्याण रेल्वे पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मध्य रात्री लोकल रेल्वेसमोर मारली उडी
रेल्वे पोलिसांनी सांगितले की, ३ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजता रविकांत अडांगळे याने रेल्वेसमोर उडी मारली. ज्यात त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळाची पाहणी करताना रविकांतजवळ एक सुसाईड नोट पोलिसांना सापडली.
पत्नी रश्मी, तिची आई अरुणा निर्भवणे आणि तिची बहीण सुनीता गायकवाड या तिघी माझा मानसिक आणि शारीरिक छळ करत आहेत. त्यातूनच मी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला आहे, असे सुसाईड नोटमध्ये लिहिलेले होते.
पत्नीचा जेवण बनवण्यास नकार
वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी सांगितले की, सुसाईड नोटमध्ये घरातील वादाचाही उल्लेख करण्यात आलेला आहे. मी आई, बहीण, मुलगा आणि पत्नी यांच्यासोबत राहतो. माझी पत्नी रश्मी ही घरातील जेवण बनवत नाही. त्यामुळे सगळ्यांसाठी बाहेरूनच जेवण मागवावं लागतं. माझी पत्नी घरातील कामेही करत नाही, असे सुसाईड नोटमध्ये म्हटलेले आहे.
यावरूनच पत्नीसोबत सातत्याने वाद सुरू होते. पत्नी रश्मी म्हणत होती की, आपण वेगळे राहू नाहीतर भांडणं सहन करत रहा. माझी वेगळं राहण्याची इच्छा नाहीये, असेही चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.