Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
By जितेंद्र कालेकर | Updated: September 11, 2025 13:17 IST2025-09-11T13:16:25+5:302025-09-11T13:17:11+5:30
Thane Cyber Crime Case: १५ दिवसांमध्ये ठाणे शहर परिसरात एक कोटींहून अधिक रकमेची सायबर गुन्हेगारांनी लुटल्याचे समोर आले आहे.

Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
-जितेंद्र कालेकर, ठाणे
Thane Crime: सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या मार्गांनी सर्वसामान्यांच्या बँक खात्यावर डल्ला मारला जात आहे. ठाण्यात एका पोलिस हवालदाराचीही अवघ्या तीन मिनिटांमध्ये आठ लाखांची फसवणूक झाली. गेल्या १५ दिवसांमध्ये ठाणे शहर परिसरात एक कोटींहून अधिक रकमेची सायबर गुन्हेगारांनी लुटल्याचे समोर आले आहे. या गुन्हेगारांचे आव्हान असले तरी अशी फसवणूक झाल्यास तातडीने तक्रार करण्याचे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे.
मोबाइल हॅक करीत सायबर भामट्यांनी ठाणे वाहतूक शाखेच्या समाधान दळवी (नावात बदल) या पोलिस हवालदारालाच आठ लाखांचा गंडा घातला. त्यांचे एचडीएफसी बँकेत दोन लाख ११ हजार ३०० इतकी रक्कम शिल्लक होती.
१ सप्टेंबरला सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांच्या सुमारास त्यांना एचडीएफसी बँकेचे पाच मेसेज आले. ऑनलाइन कर्ज प्रक्रियेसाठी हा मेसेज होता. फंड ट्रान्सफर लिमिट वाढविण्यासाठी मेसेजद्वारे ओटीपी आला होता. त्यात फंडाची लिमिट १५ लाखांची होती.
मेसेजमधील ओटीपी कोणालाही ट्रान्सफर न करताच अवघ्या तीनच मिनिटांत म्हणजे ९ वाजून १३ मिनिटांनी त्यांच्या बँक खात्यात सहा लाख ८१ हजार ३५० रुपये जमा झाल्याचाही त्यांना मेसेज आला. त्यानंतर पाच लाख आणि तीन लाख रुपये त्यांच्या बँक खात्यातून अवघ्या काही अंतराने सायबर भामट्याने अन्यत्र वळते केले.
दळवी यांचा मोबाइल हॅक करून सायबर भामट्यांनी ऑनलाइन प्रोसिजर करीत बँकेतून त्यांच्या नावाने वैयक्तिक कर्ज काढले. बँक अधिकाऱ्यांनीही खातरजमा न करताच हे कर्ज मंजूरही केले. यातूनच आपली फसवणूक झाल्याची तक्रार त्यांनी ५ सप्टेंबरला ठाणेनगर पोलिस ठाण्यात दाखल केली.
तक्रारीनंतर बँक खाते गोठविले जाते
फसवणुकीमध्ये तक्रारीनंतर पोलिसांकडून संबंधित बँक खाते गोठविण्याची प्रक्रिया केली जाते. नागरिकांनी गोल्डन अवर्स म्हणजेच संबंधित बँक खात्यातून पैसे ठकसेनांकडून काढण्याच्या आधीच तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने एका खासगी व्यावसायिकाला ३३ लाख ५८ हजारांचा गंडा घातल्याचा असाच आणखी एक प्रकार समोर आला. या गेल्या पाच वर्षांपासून शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या या तक्रारदाराला २३ जुलै २०२५ रोजी अनन्या मेहता या महिलेचा फोन आला.
मोतीलाल ओसवाल शेअर ट्रेडिंगमधून बोलत असल्याचे सांगत ब्लॉक ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास १० ते १५ टक्के नफा देण्याचे आमिष तिने दाखविले. त्यानंतर ॲप डाऊनलोड करण्यास सांगून बँक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले.
२९ जुलै ते १८ ऑगस्ट दरम्यान ट्रेडिंग कंपनीमध्ये ३३ लाख ५८ हजारांची रक्कम पाठविली. परंतु त्यांना त्यांची मुद्दल किंवा नफ्याची कोणतीही रक्कम मिळाली नाही. या फसवणुकीची व्यावसायिकाने ६ सप्टेंबरला चितळसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.