कासारवडवलीमध्ये तरुणीचा गळा आवळून खून
By जितेंद्र कालेकर | Updated: July 6, 2025 20:45 IST2025-07-06T20:43:28+5:302025-07-06T20:45:46+5:30
ठाण्यात एका तरुणीची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे.

कासारवडवलीमध्ये तरुणीचा गळा आवळून खून
ठाणे : कासारवडवलीतील शेडाेबाे मंदिर राेडकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्यालगत राेनक ग्रुप कन्स्ट्रक्शन साइटसमाेर माेकळ्या जागेत एका १५ ते १७ वर्षीय तरुणीचा गळा आवळून खून केल्याचे आढळले. या तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात येत असून, तिचा खून करणाऱ्या आराेपीचाही शाेध घेण्यात येत असल्याची माहिती कासारवडवली पाेलिसांनी रविवारी दिली.
कासारवडवली पाेलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील शेडाेबाे मंदिर राेडच्या भागात माेकळ्या जागेत हिरव्या रंगाची सलवार कुर्ता परिधान केलेल्या तरुणीचा मृतदेह ५ जुलै २०२५ राेजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आढळला. गळ्याला ओढणी घट्ट आवळून गुंडाळलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह पाेलिसांना मिळाला. रंग काळा सावळा, उंची चार फूट या वर्णनाच्या अज्ञात तरुणीची ओळख पटविण्यात येत असून, याबाबत काही माहिती असल्यास त्यांनी कासारवडवली पाेलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पाेलिस उपनिरीक्षक नितीन हांगे यांनी केले आहे. खून झालेली तरुणी काेण आहे? तिचा काेणी आणि काेणत्या कारणामुळे खून केला, याचा तपास करण्यात येत असल्याचेही पाेलिसांनी सांगितले.