ठाणे: पट्टे, रॉड अन् बांबूने लहानग्यांना मारहाण, बालआश्रमातील वास्तव; ४ मुलींवर झाले अत्याचार
By सदानंद नाईक | Updated: April 18, 2025 07:45 IST2025-04-18T07:42:58+5:302025-04-18T07:45:17+5:30
Thane Crime: साडेतीन वर्षांपासून १२ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना येथे पट्टे, रॉड, बांबूने मारहाण केली जात होती.

ठाणे: पट्टे, रॉड अन् बांबूने लहानग्यांना मारहाण, बालआश्रमातील वास्तव; ४ मुलींवर झाले अत्याचार
- सदानंद नाईक, उल्हासनगर
बालकल्याण समितीच्या खडवलीच्या बालआश्रमात चार मुलींवर तेथील कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात उघड झाले. संचालक बबन शिंदे याच्याकडे तक्रार करूनही त्याने याकडे कानाडोळा केला.
साडेतीन वर्षांपासून १२ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना येथे पट्टे, रॉड, बांबूने मारहाण केली जात होती. अनेक मुलांच्या शरीरावर त्याचे वळ आढळले. मुला-मुलींना रक्त निघेल इतके चिमटे काढण्यात आले, असे बालकल्याण समितीच्या चाैकशीत आढळले आहे.
खडवली येथील बालआश्रमाचे संचालक बबन नारायण शिंदे, त्यांची पत्नी आशा बबन शिंदे, मुलगा प्रसन्न बबन शिंदे यांच्यासह मदत करणारे प्रकाश सुरेश गुप्ता व दर्शना लक्ष्मण पंडित या पाच जणांवर टिटवाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
६ मुली विशेष बालगृहात
बालआश्रमातील मुलांचे वय साडेतीन ते १२ वर्षांपर्यंत असून त्यामध्ये २० मुली व नऊ मुलांचा समावेश आहे. पाच वर्षांच्या आतील सहा मुलांना नेरुळ नवी मुंबई येथील विशेष बालगृहात पाठविले असून यातील चार मुलांना स्वतःचे नावही धड सांगता येत नाही. बालकल्याण समितीचे प्रतिनिधी मुलांच्या पालकांशी संपर्क साधत आहेत.
शासकीय मान्यताप्राप्त २५ बाल आश्रम
ठाणे जिल्ह्यात शासनाची मान्यताप्राप्त २५ बाल आश्रम असून त्यामध्ये शिंदेच्या आश्रमाचा समावेश नाही. शासकीय दोनच बाल आश्रम असून त्यातील एक भिवंडीत तर दुसरा उल्हासनगरात आहे.
आश्रमाच्या नावावर देणग्या
‘पसायदान विकास संस्थेचा संचालक बबन शिंदे हा पुणे जुन्नर येथील राहणारा. तो यापूर्वी मुंबईत कामाला होता. आश्रमाची जागा व इमारत त्यांची स्वतःची आहे.
२०१६ साली धर्मादाय आयुक्तांकडून बाल आश्रमाची परवानगी घेऊन खडवली येथे गेल्या ७ ते ८ वर्षांपासून बाल आश्रम सुरू केला. आतापर्यंत साडेतीन हजार मुलांनी आश्रमाचा फायदा घेतल्याचा दावा त्याने केला.
आश्रम चालवण्याकरिता त्याने देणग्या घेतल्याचे उघड झाले. शिंदेला कुठल्या नेत्याचा राजाश्रय होता, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.
मुलींचे समुपदेशन सुरु
न्यायालयाने आरोपींना १६ एप्रिलला न्यायालयीन कोठडी दिली, अशी माहिती टिटवाळ्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांनी दिली. चौकशीत चार मुलींवर अत्याचार झाल्याचे उघड झाले. इतर मुलींचे समुपदेशन सुरू असल्याची माहिती बालकल्याण समितीच्या अध्यक्षा राणी बैसाणे यांनी दिली आहे.