Thane: भावाच्या पत्नीचा केला होता खून, तब्बल २३ वर्षांनंतर डोंबिवलीत आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 16:35 IST2025-03-19T16:34:23+5:302025-03-19T16:35:24+5:30
Thane Crime news: महिलेच्या हत्येनंतर आरोपी तिच्या ५ महिन्याच्या मुलासह पसार झाला होता.

Thane: भावाच्या पत्नीचा केला होता खून, तब्बल २३ वर्षांनंतर डोंबिवलीत आरोपीला अटक
-मंगेश कराळे, नालासोपारा
भावाच्या पहिल्या पत्नीचा चाकूने गळा चिरून हत्या करणाऱ्या आरोपीला तब्बल २३ वर्षानंतर डोंबिवलीतून अटक करण्यात आली. मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. महिलेच्या हत्येनंतर आरोपी तिच्या ५ महिन्याच्या मुलासह पसार झाला होता, अशी माहिती सपोनि व जनसंपर्क अधिकारी शिवकुमार गायकवाड यांनी बुधवारी दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरोज व त्यांची मयत पहिली पत्नी शबाना यांच्या लग्नाला त्यांचा मोठा भाऊ व आरोपी तरबेजचा विरोध होता. तरीही फिरोज यांनी शबाना सोबत लग्न केले होते. त्यानंतर त्यांनी घरातील लोकांच्या आग्रहाखातर आफरीन बानू हिच्या सोबत दुसरे लग्न केले होते.
प्रकरण काय, कशी केली होती हत्या?
घटनेपूर्वी पहिली पत्नी शबाना गोवंडी व दुसरी पत्नी विरार येथे राहण्यास होती. ३ जून २००२ रोजी शबाना ही तिचा मुलगा अफरोज (५ महिने) याच्यासोबत आफरीन राहत असलेल्या विरारच्या चंदनसार रोडवरील परमात्मा पार्क बिल्डिंगमध्ये आली.
हाच मनात राग धरुन आरोपी तरबेज व आफरीन यांनी चाकूने शबाना हिचा गळा कापून निर्घृण हत्या केली. त्यानंतर तिच्या ५ महिन्याच्या मुलाला पळवून नेल्याचे निष्पन्न झाले होते. विरार पोलिसांनी हत्या व अपहरणाचा ६ जून २००२ साली गुन्हा दाखल केला होता. आरोपी तरबेज हा घटना घडल्यापासून म्हणजे गेल्या २३ वर्षापासून फरारी होता.
पोलिसांनी आरोपीला कसे पकडले?
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर व संवेदनशील गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्याचे आदेश केले होते. त्याप्रमाणे मध्यवर्ती गुन्हें प्रकटिकरण कक्षाचे पोलीस पथकाने गुन्ह्याची विरार पोलीस ठाण्यातून माहिती घेवून सातत्याने पाठपुरावा केला.
आरोपीच्या बिहार राज्यातील मूळ गांव चमन होली येथून तो डोंबिवली येथे आपले अस्तित्व लपवुन राहत असल्याची माहीती मिळाली. मिळालेल्या माहीती प्रमाणे तपास करत आरोपी तरबेज (५२) हा डोंबिवलीच्या कोळेगाव येथील ओमसाई चाळ येथून १७ मार्चला मिळून आला.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे व सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पो.निरी. अविराज कुराडे, सपोनिरी. दत्तात्रय सरक, नितीन बेंद्रे, प्रशांत गांगुर्डे, पुष्पराज सुर्वे, सहापोउपनिरी. श्रीमंत जेधे, मनोहर तावरे, आसीफ मुल्ला, पोहवा. शिवाजी पाटील, गोविंद केंदे, धनंजय चौधरी, संदिप शेरमाळे, संतोष मदने, रविंद्र भालेराव, प्रविणराज पवार, हनुमंत सुर्यवंशी, समीर यादव, विकास राजपुत, रविंद्र कोथळे, विजय गायकवाड, नितीन राठोड, सफौ संतोष चव्हाण, मसुब सचिन चौधरी यांनी केली आहे.