मनसेचे नेते जमील शेख खून प्रकरणी यूपीच्या एसटीएफने केली गोळीबार करणाऱ्यास अटक
By जितेंद्र कालेकर | Updated: April 4, 2021 00:13 IST2021-04-03T23:58:35+5:302021-04-04T00:13:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे राबोडीतील शाखाध्यक्ष जमील अहमद शेख (४९) यांच्या खून प्रकरणी उत्तरप्रदेशातील लखनौ ...

दोन लाखांमध्ये दिली होती सुपारी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे राबोडीतील शाखाध्यक्ष जमील अहमद शेख (४९) यांच्या खून प्रकरणी उत्तरप्रदेशातील लखनौ शहरातून इरफान शेख (२१) या अन्य एका आरोपीला स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने शनिवारी दुपारी ताब्यात घेतले आहे. त्याला लवकरच ठाण्यात आणले जाणार आहे. इरफान याला दोन लाख रुपयांची सुपारी ओसामा याने दिल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.
जमील शेख यांची २३ नोव्हेंबर २०२० रोजी दिवसाढवळया ठाण्यातील राबोडीमध्ये गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी जमील हे त्यांच्या दुचाकीवरुन जात असतांना त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या हेल्मेट घातलेल्या इरफान याने त्यांच्यावर गोळीबार केला होता. त्यावेळी शाहीद शेख (२५, रा. राबोडी, ठाणे) हा इरफान सोबत होता. तोच मोटारसायकलही चालवित होता. त्याला या हत्याकांडानंतर २५ नोव्हेंबर २०२० रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने अटक केली होती. दरम्यान, यातील गोळीबार करणाºया इरफान याला ताब्यात घेण्यासाठी युनिट एक तसेच खंडणी विरोधी पथकही गेल्या चार महिन्यात अनेक वेळा उत्तरप्रदेशमध्ये जाऊन आले होते. मात्र, तो हुलकावणी देत होता. तो आता लखनौ शहरातील विभुतीखंड भागात आला असल्याची टीप ठाणे पोलिसांना मिळाली होती. त्याच आधारे उत्तरप्रदेशच्या एसटीएफचे पोलीस निरीक्षक सत्यप्रकाश सिंग, उपनिरीक्षक सूरज सिंग आणि पोलीस कॉन्स्टेबल सुशिल चौधरी तसेच ठाण्याच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल जाधव, आनंदा भिलारे, पोलीस हवालदार रवींद्र काटकर, पोलीस नाईक तौसिफ पठाण आणि अमोल देसाई आदींच्या पथकाने त्याला शनिवारी दुपारी ताब्यात घेतले. त्याची न्यायालयामार्फत ट्रान्सिट कोठडी घेऊन ठाण्यात आणले जाणार आहे.
* दोन लाखात सुपारी
जमीलच्या हत्येसाठी इरफान याला ओसामा याने दोन लाखांची सुपारी दिली होती. मात्र, हत्येनंतर यातील काहीच रक्कम मिळाली नसल्याचे इरफान याने पोलिसांना सांगितले आहे. ओसामा याला ही सुपारी कोणी दिली? याचा खुलासा मात्र ओसामाला ताब्यात घेतल्यानंतरच होईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी सांगितले.
* एसटीएफकडून राष्टÑवादीच्या नगरसेवकाचा उल्लेख
दरम्यान, या हत्येप्रकरणी जमीलच्या कुटूंबीयांकडून यापूर्वीच राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. एसटीएफनेही काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात मुल्ला यांचा उल्लेख केल्याने ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.
‘‘ कोणत्याही ऐकीव माहितीवर कोणी सुपारी दिली हे स्पष्ट होत नाही. जोपर्यंत इरफानची ठाण्यात आणून चौकशी होत नाही. तो जोपर्यंत कोणाचे नाव सांगत नाही. तोपर्यंत यातील मुख्य सूत्रधार कोण? आणि जमीलची हत्या का झाली ?हे स्पष्ट होणार नाही’’
लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपायुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग, ठाणे शहर
...............................
ॅहत्येच्या वेळी ओसामाही होता हजर- इरफानची कबूली
ओसामाने शाहीद आणि आपल्याला २३ नोव्हेंबर २०२० रोजीच जमीलची हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती. त्यावेळी शाहीद आणि इरफान हे ओसामाच्या मोटारसायकलवरुन राबोडी मस्जिदकडे गेले. तर ओसामा हा शाहीदच्या मोटारसायकलवरुन या दोघांच्याच बाजूने जात होता. जमील जेंव्हा मस्जिदमधून बाहेर पडले, त्यावेळी मोटारसायकल चालविणाºया शाहीदसह इरफानने त्यांचा पाठलाग केला. काही अंतर गेल्यानंतर इरफानने त्यांच्यावर गोळीबार केला, अशी कबूलीच त्याने एसटीएफला दिली आहे. दरम्यान, नजीब मुल्ला यांचा एसटीएफने लखनौ येथे शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तसेच प्रसिद्धीपत्रकातही उल्लेख केल्याने ठाणे पोलीस अवाक झाले. आरोपीकडून मात्र असा कोणताही दुजोरा मिळाला नसल्याचे ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
...........................
एसटीएफची प्रेसनोट व्हायरल झाल्याने राबोडीत तणाव
उत्तरप्रदेशच्या एसटीएफची प्रेसनोट सोशल मिडियावरुन व्हायरल झाली. यात नजीब मुल्ला यांचा उल्लेख असल्यामुळे ठाण्यातील राबोडीमध्ये पाच महिन्यांनंतर पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मुल्ला यांच्या कार्यालयाचीही एका गटाने तोडफोड केली. या धुमश्चक्रीनंतर राबोडीत पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्यासह राबोडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे हे रात्री दाखल झाले. मात्र, जमील यांच्या घराजवळील परिसरात तणाव होता. त्याठिकाणी एका गटाने पोलिसांबरोबर पुन्हा बाचाबाचीही केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून याठिकाणी आता दंगल नियंत्रण पथकासह राज्य राखीव दलाची कुमकही तैनात करण्यात आली आहे.