धक्कादायक! वाहनाच्या धडकेने ठाण्यात पादचाऱ्याचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 00:03 IST2020-06-15T23:57:25+5:302020-06-16T00:03:22+5:30
ठाण्यातील नितीन कंपनीजवळील उड्डाणपूलाजवळ १३ जून रोजी एका ५० वर्षीय अनोळखीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात त्याचा मृत्यु झाला. मृत पावलेली ही व्यक्ती कोण आहे? तिचे नातेवाईक कोण आहेत? याचा शोध नौपाडा पोलीस घेत आहेत.

नातेवाईकांचा शोध सुरु
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: अज्ञात वाहनाच्या धडकेने ५५ ते ६० वर्षीय पादरचा-याचा मृत्यु झाल्याची घटना नितीन कंपनीजवळील उड्डाणपूलाजवळ शनिवारी सकाळी घडली. अपघातग्रस्त मृतदेहाची ओळख पटली नसून त्याच्या नातेवाईकाचा शोध घेण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.
नितीन कंपनी ते माजीवडा मार्गावर १३ जून रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. भरघाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाच्या धडकेने या पादचा-याचा जागीच मृत्यु झाला. सध्या ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात हा मृतदेह ठेवण्यात आला आहे. हिरवा टी शर्ट, काळी पॅन्ट, मध्यम बांधा असलेल्या या व्यक्तीची माहित असणाऱ्यांनी नौपाडा पोलिसांशी ०२२- २५४२३३०० अथवा ९७६६०४२०९६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक अनिकेत पोटे यांनी केले आहे.