दहीहंडीच्या नगरीत उद्धव सेनेची निष्ठेची महादहीहंडी, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे राहणार उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 13:54 IST2025-08-14T13:53:00+5:302025-08-14T13:54:18+5:30
Dahi handi News: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या दहीहंडीत यंदा निष्ठेची महा दहीहंडी साजरी करण्यात येणार आहे.

दहीहंडीच्या नगरीत उद्धव सेनेची निष्ठेची महादहीहंडी, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे राहणार उपस्थित
ठाणे - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या दहीहंडीत यंदा निष्ठेची महा दहीहंडी साजरी करण्यात येणार आहे. यंदाचे हे १९ वे वर्ष मुंबईसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिप्रीत्यर्थ १ लाख ११ हजार १११ मनाची हंडी, ठाण्यासाठी आनंद दिघे स्मृतिप्रीत्यर्थ १ लाख ११ हजार १११ मनाची हंडी, महिलांसाठी माँसाहेब मीनाताई ठाकरे स्मृतिप्रीत्यर्थ ५१ हजारांची हंडीसह थर लावणाऱ्या पथकांना भरघोस रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. या सोहळ्यात युवासेनाप्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे अशी माहिती शिवसेना नेते, माजी खा. राजन विचारे यांनी दिली.
खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, विनायक राउत, आदेश बांदेकर व इतर मान्यवरही या दहीहंडीला भेट देणार आहेत. या महादहीहंडी बरोबर संगीताची मेजवानी व करमणुकीसाठी महाराष्ट्रातील पारंपारिक लोककला नृत्य मराठी-हिंदी गाणी असे विविध कार्यक्रम तसेच मराठी हिंदी सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार या महादहीहंडी उत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत. गोकुळाष्टमीच्या दिवशी सायंकाळी ७ वाजता दिव्यांग मुलांसाठी दहीहंडीचे आयोजन करण्यात येणार आहे. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दिव्यांग मुलांसाठी आर्थिक मदत व पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहे. दरवर्षी या उत्सवाची सुरुवात दिव्यांग, कँसर पीडित मुलांच्या साक्षीने करण्यात येते. विशेष मुलांना हिंदू उत्सवाचा आनंद लुटता यावा यासाठी आयोजन करण्यात येत असल्याचे आयोजक विचारे यांनी सांगितले.