- शाम धुमाळ, कसाराशहापूर तालुक्यातील कसारा जवळील फुगाळे गावातील आघान वाडीत एका डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक खाली कोसळला. ड्रोन कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला. त्यामुळे डोंगरावर खेळत असणारी मुले आणि गावातील नागरिकांमध्ये घबराट उडाली होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गुरूवारी (१५ मे) दुपारी 2 वाजेच्या सुमारास आघानवाडीतील लहान मुलं डोंगरावर खेळत होते. अचानक आकाशात एक ड्रोन दिसला. मोठा आवाज करीत हा ड्रोन हवेत घिरट्या घालत होता. त्याचेळी तो एका झाडावर पडला.
मुलं म्हणाली विमान पडले
मोठा आवाज होत ड्रोन पडल्याने खेळणाऱ्या मुलांनी घटनास्थळी धाव घेतली. लहान मुलांना या ड्रोनबाबत माहिती नव्हती. विमानासारखे दिसणारे ड्रोन बघून ते विमान पडले. विमान पडले असे ओरडू लागले.
त्यांनी झाडावर पडलेले तो ड्रोन झाडावरून खाली उतरवून डोंगराच्या खाली वस्तीजवळ आणला. सरपंच जिवा भला यांनी याबाबत तात्काळ कसारा पोलीस ठाण्याशी संपर्क करून त्यांना माहिती दिली.
कसारा पोलिसांनी सदर ड्रोन बाबतची माहिती वरिष्ठाना दिली. पोलीस निरीक्षक सुरेश गावीत यांनी आपल्याला कर्मचाऱ्यांसाह घटनास्थळी धाव घेतली.
कोसळेला ड्रोन कोणाचा?
दरम्यान, सदर ड्रोन एका सर्व्हे कंपनीचा असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. जलसंपदा विभागाचा वाडा तालुक्यात सर्व्हे सुरु आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पायोनियर इन्फ्रा या ठेकेदार कंपनीने ड्रोनच्या मदतीने सर्व्हे सुरु केला होता.
सर्व्हे सुरु असताना ड्रोनची दिशा भरकटली. सदर ड्रोन शहापूर तालुक्यातील फुगाळे आघानवाडी येथील डोंगरावरील एका झाडावर पडला. ठेकेदार कंपनीने याबद्दलची माहिती कसारा पोलिसांना दिली आहे.
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
गेल्या काही दिवसांपासून भारत पाकिस्तान यांच्यात संघर्ष पेटला होता. पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले केले गेले. सीमेवरील संघर्ष थांबलेला असतानाच हा ड्रोन कोसळल्याने ग्रामस्थांनामध्ये भीती निर्माण झाली होती.
दरम्यान, या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी.एस. स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश गावीत पुढील तपास करीत आहेत.