राजू काळेभार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेकडून शहरातील विरंगुळा केंद्राचे सदस्य असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एक दिवसाचे पर्यटन सहलीच्या माध्यमातून लवकरच घडविले जाणार असल्याची ग्वाही महापौर डिंपल मेहता यांनी पालिकेने १ आॅक्टोबरच्या ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त गुरुवारी मॅक्सेस मॉलमधील बॅक्विट हॉलमध्ये आयोजित ज्येष्ठ नागरिक सप्ताह सोहळ्यात दिली.ज्येष्ठांची गेल्या अनेक वर्षांपासूनची असलेली मागणी पूर्ण होण्याचे संकेत महापौरांनी दिल्याने उपस्थित ज्येष्ठांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. महापौरांनी शहरातील ज्येष्ठांसाठी पालिकेने अधिकाधिक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना उपस्थित अधिका-यांना केली. पालिकेच्या स्वच्छता मोहिमेत ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग उल्लेखनीय असून त्यांनी स्वच्छ सुंदर, मीरा-भार्इंदर या घोषवाक्यानुसार शहर स्वच्छतेत आणखी योगदान देण्याचे आवाहन केले. ज्येष्ठांनी आपल्या अनुभवातून तरुणांना स्वच्छतेचे ज्ञान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच आ. नरेंद्र मेहता यांनी, ज्येष्ठांचा शहराच्या विकासाला हातभार लावण्यासाठी त्यांनी थेट महापौरांकडेच सूचना सादर करण्याचे आवाहन केले. चांगल्या सूचनांवर महापौरांनी पालिकेला ठोस कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.ज्येष्ठांच्या सोईसुविधांसाठी पालिकेला अंदाजपत्रकात अधिकाधिक निधीची तरतूद करण्याची सूचना महापौरांकडून करण्यात यावी, अशी मागणीसुद्धा त्यांनी केली. यावेळी उपमहापौर चंद्रकांत वैती, सभागृह नेता रोहिदास पाटील व पालिकेचे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी सुद्धा आपल्या भाषणात ज्येष्ठ नागरीकांच्या हिताची चिंता व्यक्त करीत पालिकेकडून त्यांना योग्य ते सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. या सोहळ्याला नगरसेविका, नगरसेवक, शहरातील विविध ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रातील ज्येष्ठ सदस्यांसह पालिकेच्या समाजविकास अधिकारी दिपाली पोवार व इतर अधिकारी व कर्मचा-यांनी हजेरी लावली. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यावर आधारित आयुष्याच्या सूर्यावर या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले.
मीरा-भाईंदरमधील ज्येष्ठ नागरिकांना एक दिवसाचे पर्यटन घडविणार; महापौर डिंपल मेहतांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 18:17 IST