पालघरमध्ये संतापजनक प्रकार! हेअर सलूनमध्ये लावलं 'काश्मीर बनेल पाकिस्तान' गाणं; उत्तर प्रदेशचा तरुण गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 14:25 IST2026-01-02T14:14:14+5:302026-01-02T14:25:58+5:30
पालघरमध्ये भारतविरोधी गाणी वाजवणाऱ्या एका सलूनवाल्याला अटक करण्यात आली आहे.

पालघरमध्ये संतापजनक प्रकार! हेअर सलूनमध्ये लावलं 'काश्मीर बनेल पाकिस्तान' गाणं; उत्तर प्रदेशचा तरुण गजाआड
Palghar Crime: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पालघर जिल्ह्यातील नायगाव परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका हेअर कटिंग सलूनमध्ये लाऊडस्पीकरवर काश्मीर बनेगा पाकिस्तान सारखी प्रक्षोभक आणि देशविरोधी गाणी वाजवल्याप्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातील एका २५ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
ही घटना नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचोटी भागातील दुर्गामाता मंदिराजवळ घडली. १ जानेवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक पंकज किलजे हे खासगी वाहनाने गस्तीवर होते. चिंचोटी येथील रुहान हेअर कटिंग सलून जवळून जात असताना त्यांना जोरात देशविरोधी गाण्याचे शब्द ऐकू आले. 'काश्मीर बनेगा पाकिस्तान' हे गाणे लाऊडस्पीकरवर मोठ्या आवाजात वाजत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी तातडीने सलूनमध्ये छापा टाकला असता, तिथे अब्दुल रहमान सदरुद्दीन शाह (२५) हा तरुण आपल्या मोबाईलवरून ब्लूटूथद्वारे हे गाणे यूट्यूबवर वाजवत असल्याचे आढळले. हा तरुण मूळचा उत्तर प्रदेशातील आझमगडचा रहिवासी आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने जमले आणि त्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
तपासात असे समोर आले आहे की, हे गाणे मूळतः पाकिस्तानी लष्कराच्या 'इंटर-सर्विसेज पब्लिक रिलेशन्स'ने भारताच्या विरोधात प्रोपेगेंडा चालवण्यासाठी २०२५ मध्ये रिलीज केले होते. भारताची सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात आणण्याच्या हेतूने हे गाणे सार्वजनिक ठिकाणी वाजवले जात असल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे.
३ वर्षांच्या तुरुंगवासाची शक्यता
नायगाव पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १९७(१)(ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हे कलम भारताच्या सुरक्षेला किंवा अखंडतेला बाधा पोहोचवणारी खोटी माहिती पसरवण्याबाबत आहे. या गुन्ह्यात दोषी ठरल्यास आरोपीला ३ वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड अशा शिक्षेची तरतूद आहे.
शांतता राखण्याचे आवाहन
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला असून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. "अशा प्रकारच्या प्रक्षोभक गाण्यांमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असते, त्यामुळे कोणीही अशा कृत्यांना खतपाणी घालू नये," असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक सामाजिक संघटनांनी देखील या घटनेचा निषेध केला असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.