भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या महिला उमेदवाराला दिलासा; छाननीत बाद झालेले १२ अर्ज कोर्टात वैध
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 07:09 IST2025-11-26T07:09:06+5:302025-11-26T07:09:29+5:30
अवैध ठरवलेल्या १२ उमेदवारांच्या अर्जाबाबतचे निर्णय न्यायालयाने योग्य असल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला.

भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या महिला उमेदवाराला दिलासा; छाननीत बाद झालेले १२ अर्ज कोर्टात वैध
अंबरनाथ : नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या भाजपच्या उमेदवार तेजश्री करंजुले यांच्या जन्मदाखल्याच्या वैधतेला आव्हान देणारा अर्ज कल्याण न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. निवडणुकीत अर्ज छाननीमध्ये ज्या उमेदवारांचे अर्ज बाद ठरवण्यात आले होते त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. १३ याचिकांपैकी १२ याचिकांचा निकाल पालिकेच्या बाजूने लागला. केवळ घोणे यांच्या प्रकरणात पालिकेने त्यांचा वैध ठरवलेला अर्ज न्यायालयाने अवैध ठरवला. करंजुले यांचा जन्मदाखला ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवरील असल्याने तो अवैध असल्याचा अर्ज करण्यात आला होता. मात्र हा दावा न्यायालयाने अमान्य केला.
गणेश घोणे यांचा अर्ज न्यायालयाने ठरवला बाद
प्रभाग क्र. ८चे अपक्ष उमेदवार गणेश घोणे यांचा छाननीत वैध ठरवलेला उमेदवारी अर्ज न्यायालयाने अवैध ठरवल्याने घोणे यांना निवडणूक लढवता येणार नाही. मात्र नगरपालिकेच्या निवडणूक विभागाने सूचक, अनुमोदक यांच्या स्वाक्षऱ्या नसल्याने किंवा अन्य तांत्रिक कारणास्तव अवैध ठरवलेल्या १२ उमेदवारांच्या अर्जाबाबतचे निर्णय न्यायालयाने योग्य असल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला.
न्यायालयात चूक कबूल
उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज आल्यामुळे अर्ज छाननीच्या वेळेस काही चुका होऊ शकतात आणि त्यातूनच प्रभाग क्रमांक आठमध्ये नजरचुकीने अपक्ष उमेदवार घोणे यांचा अर्ज वैध ठरवला गेला. मात्र हा अर्ज न्यायालयाने अवैध ठरवला. या प्रकरणात पालिका प्रशासनाने स्वतःची चूक न्यायालयात कबूल केली. कल्याण न्यायालयाने सर्व अर्जांवर मंगळवारी निकाल दिल्याने आता निवडणुकीची पुढची प्रक्रिया सोपी झाली. बुधवारी अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप करण्याचा मार्ग मोकळा झाला.