दंड भरण्यास नकार देत ठाण्यात वाहतूक पोलिसांना तिघांची मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 22:26 IST2019-07-16T22:19:33+5:302019-07-16T22:26:18+5:30
केंद्र सरकाने बंदी घातलेली काळी फिल्म कारचा काचांना लावून सर्रास गाडी हाकणाऱ्या अमर दास याने पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जाण्याऐवजी पोलिसांवरच दमबाजी करीत त्यांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी ठाण्याच्या तीन हात नाका येथे घडली.

दोघांना अटक तिसरा पसार
ठाणे: वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत काळी फिल्म लावणा-या अमर अनिल दास (रा. भांडूप) या कार चालकाला दंड भरण्यास सांगितल्याचा राग आल्याने त्याच्यासह केतन माळी आणि जितेश पाटील या तिघांनी कर्तव्यावरील वाहतूक पोलिस तौसिफ शेख यांना अरेरावी करीत मारहाण केल्याची घटना तीन हात नाका येथे मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर केतन आणि जितेश याला पोलिसांनी अटक केली असून मुख्य आरोपी दास हा मात्र पसार झाला आहे.
ठाण्यातील तीन हात नाका येथून जाणा-या एका कारवर बेकायदेशीरपणे काळया रंगाच्या फिल्म लावलेल्या वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांना आढळले. त्यामुळे तिथे तैनातीला असलेले पोलीस हवालदार शेख आणि त्यांच्या पथकाने ही कार अडवली आणि कार चालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू केली. याचा राग आल्याने कार चालक दास याने केतन आणि जितेश या दोन साथीदारांना भांडूप येथून त्याठिकाणी बोलविले. या तिघांनीही वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.