आरबीएल, अभ्युदय बँकांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करणा-या टोळीचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 19:32 IST2017-11-02T19:31:44+5:302017-11-02T19:32:17+5:30
येथिल मानापाडा रोडवरील आरबीएल, अभ्युदय या बँकाना रोकड पुरवणा-या कॅशव्हॅनवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणा-या टोळीचा टिळकनगर पोलिसांनी पर्दाफाश केला असून त्यात दोघांना..

आरबीएल, अभ्युदय बँकांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करणा-या टोळीचा पर्दाफाश
डोंबिवली: येथिल मानापाडा रोडवरील आरबीएल, अभ्युदय या बँकाना रोकड पुरवणा-या कॅशव्हॅनवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणा-या टोळीचा टिळकनगर पोलिसांनी पर्दाफाश केला असून त्यात दोघांना अटक करण्यात आली आहे. तर त्यांचे त्यांचे अन्य तीन साथीदार घटनास्थळावरुन पळाल्याची घटना बुधवारी घडली. राजीव सुंदरराव, (३४ )रा. तिप्पा,बेहरगुंडा, वेल्लुर-आंध्रप्रदेश, आणि बालन्ना दानप्पा प्रसंगी रा. बेंगलोर अशी अटक केलेल्या आरोपिंची नावे आहेत.
अटक केलेल्यांसह चिन्ना बोरचू, विजय अकुला, मिकायल तिघेही रा. आंध्रप्रदेश हे फरार आहेत. ही पाच जणांची टोळी बुधवारी सकाळी ११.३० वाजता सीक्वयूअर व्हॅल्यू या खासगी कॅशव्हॅन कंपनीची रोकड लुटण्यासाठी डोंबिवलीत मानपाडा रोड येथे आले होते. ते दरोडा टाकणार असल्याची माहिती टिळकनगर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण आणि चैन स्रॅचिंग स्क्वॉडला मिळाली होती, त्यानूसार या पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शिवाजी धुमाळ यांनी पोलीस निरिक्षक महेश जाधव यांच्या पथकाला या बँकांच्या इमारतीनजीक सापळा रचण्यास सांगितला होता. सकाळी ११.३० ते पावणेबाराच्या सुमारास ही टोळी कॅशव्हॅनवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांनाच पोलिसांनी रंगेहाथ अटक केली, त्या झटापटीत त्यांचे तीन साथीदार पळाले. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले वरील दोघे मुख्य आरोपि असल्याचे जाधव यांनी सांगितले. या टोळीकडे स्क्रूड्रायव्हर, चॉपरयासह अन्य शस्त्रे आणि दुचाकी मिळाली असून ते सर्व जप्त करण्यात आले आहे.
या टोळीने अंबरनाथ, डोंबिवली, ठाणे, नवीमुंबई, खारघर, रायगड आदी ठिकाणी चैनस्रॅचिंगसह अन्य घरफोड्या यासह लूट केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या सगळयांना अटक केली असून या टोळीकडून आणखी विविध गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. अटक आरोपिंना ६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असून टिळकनगर पोलिस ठाणे पुढील तपास करत आहेत.
१८ आॅगस्ट रोजी मानपाडा रोडवरील जनलक्क्ष्मी फायनान्स या कंपनीच्या कॅशव्हॅनमधील सुमारे १८ लाखांची रोकड दिवसाढवळया लुटण्यात आली होती. त्या घटनेतही दुचाकीवरच हल्लेखोर,लुटारु आले होते. त्या घटनेत वरील अटक केलेल्या टोळीचा संबंध आहे का? याचीही चाचपणी पोलिस यंत्रणा करण्याची शक्यता आहे. त्या गुन्ह्याचा तपास मानपाडा पोलिस ठाणे करत आहे. काही महिन्यांपासून त्या गुन्ह्याचा तपास कागदावरच राहीला होता.