आनंद दिघे स्मारकासाठी निधीची तरतूद करा, मनसे, भाजप आक्रमक; शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 23:45 IST2021-01-29T23:44:41+5:302021-01-29T23:45:08+5:30
भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनीही स्मारकासाठी मनपाच्या अर्थसंकल्पात १०० कोटींची तरतूद करण्याच्या प्रस्तावाची सूचना दिली आहे.

आनंद दिघे स्मारकासाठी निधीची तरतूद करा, मनसे, भाजप आक्रमक; शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष
ठाणे : शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना...मात्र याच शिवसेनेला स्वर्गीय आनंद दिघे यांचा विसर पडल्याचा आरोप करीत गुरुवारी मनसेने ठाण्यात आनंद दिघे यांचे स्मारक व्हावे या मागणीसाठी ठामपा आयुक्तांची भेट घेतली. भाजपनेही अर्थसंकल्पात दिघे स्मारकासाठी १०० कोटींची तरतूद करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात भाजपच्या नगरसेवकाने प्रस्तावाची सूचनाही मांडली आहे.
मनसे आणि भाजप दिघे स्मारकासाठी आग्रही झाल्याने शिवसेना याबाबत काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक झाल्यानंतर ठाण्यात दिघे यांचे स्मारक व्हावे या उद्देशाने गुरुवारी मनसेचे ठाणे, पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान जांभळी नाका परिसरातील उंच घड्याळाच्या मनोरच्या जागेवर स्मारक उभारण्याची मागणी त्यांनी केली. सर्वपक्षीय नगरसेवकांचा निधी या कामी घेण्याची सूचनाही त्यांनी केली. ठाणे जिल्ह्यात आनंद दिघे यांचे नाव कायम स्मरणात राहणारे आहे. त्यांचे सर्वपक्षीयांबरोबर चांगले नाते होते. चांगल्यासाठी चांगले आणि वाईटासाठी वाईट अशी त्यांची ख्याती होती. त्यामुळे त्यांचे स्मारक ठाण्यात व्हावे, अशी इच्छा असल्याचे जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले. स्मारकासाठी निधी मिळत नसेल तर मनसेचे पदाधिकारी घरोघरी जाऊन निधी गोळा करतील, असेही त्यांनी स्पष्ट करून शिवसेनेला डिवचण्याचे कामच केले आहे. दिघे यांची आठवण शिवसेनेला केवळ निवडणुकीपुरतीच होते. इतर वेळेस त्यांचा विसर पडत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
भाजप नगरसेवकानेही दिले निवेदन
भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनीही स्मारकासाठी मनपाच्या अर्थसंकल्पात १०० कोटींची तरतूद करण्याच्या प्रस्तावाची सूचना दिली आहे. दिघे यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय होते. राजकीय मंडळींसाठी ते हक्काचा आधार होते. त्यामुळेच त्यांचे स्मारक व्हावे, अशी इच्छा पाटील यांनी व्यक्त केली आहे. २०२१-२२ मध्ये ५० कोटी आणि २०२२-२३ मध्ये ५० कोटी अशा दोन टप्प्यांत या निधीची तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के, स्थायीचे सभापती संजय भोईर आणि आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे दिले आहे.