Proper diet, adequate sleep, regular exercise, and a controlled lifestyle are important: dietitians say | योग्य आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि नियंत्रित जीवनशैली महत्त्वाचे : आहारतज्ञांनी मांडले मत 

योग्य आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि नियंत्रित जीवनशैली महत्त्वाचे : आहारतज्ञांनी मांडले मत 

ठळक मुद्देविस्कळीत जीवनशैली अनेकविध रोगांना आमंत्रण आरोह व्याख्यानमालेचे आयोजनशरीराच्या पुनर्बांधणीसाठी उत्तम झोप घेणे आवश्यक

ठाणे : योग्य आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि नियंत्रित जीवनशैली हे निरोगी आयुष्याचे चार प्रमुख स्तंभ असल्याचे मत आहारतज्ञांनी मांडले. सध्याच्या शहरातल्या धावपळीच्या आयुष्यात आरोग्यपूर्ण आहाराकडे तरुणांचं दुर्लक्ष होत असून अशी विस्कळीत जीवनशैली अनेकविध रोगांना आमंत्रण असल्याची निरीक्षणं सर्रास नोंदवली जातात आणि म्हणूनच वैयक्तिक आणि  सामाजिकदृष्ट्या हा विषय महत्त्वाचा असल्याने सभागृह प्रेक्षकांनी तुडम्ब भरले होते.

     युवकांनी युवकांसाठी सुरु केलेली संस्था - युगांतर प्रतिष्ठानतर्फे ठाण्यातील सहयोग मंदिर सभागृहात आरोह व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या , व्याख्यानमालेच्या ६ व्या वर्षी , प्रथम सत्रामध्ये 'फिटनेस- मोर ऑफ या क्रेझ लेस ऑफ या लाइफस्टाइल' या विषयावर मुक्त चर्चा रंगली. श्रोत्यांना या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी स्ट्रेंथ अँड कंडिशनल कोच तनुजा लेले आणि विक्रम फिटनेस सेंटरचे संस्थापक विक्रम मेहेंदळे हे दोन तरुण पाहुणे म्हणून लाभले होते. व्याख्यानमालेच्या या सत्राची सुरुवात पाहुण्यांनी विषयाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण आणि आवश्यक माहिती देऊन केली. श्रोत्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तर देताना प्रत्येक माणसाने एका वेळी मर्यादित आहार घेणं आवश्यक असून फळं, दूध, प्रथिनं आणि स्निग्ध पदार्थ यांचा योग्य मिलाफ असलेला घरगुती आहार सबंध दिवसात ग्रहण करणं महत्त्वाचं असल्याचं तनुजा लेले यांनी सांगितलं. 'वदनी कवळ घेता' या श्लोकामध्ये सांगितलेल्या उक्तीनुसार अन्नदेवतेला शरण जाऊन परमेश्वराला वाहिलेल्या प्रसादाच्या मात्रेचा आहार एका वेळी असावा असं मत तनुजा यांनी मांडलं. चालणं हा व्यायाम नसून ती एक ऍक्टिव्हिटी आहे असं सांगताना व्यायाम करतानाच्या योग्य पद्धती आणि चालताना आवश्यक असलेली पाय आणि शरीराची ठेवण याबाबतींत त्यांनी प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन केले. त्याचवेळी आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे दिवसाच्या २४ तासांचे ३ भाग केले असून त्यातले ८ तास उदरनिर्वाहासाठी, ८ तास इतर निवडक क्रियांसाठी आणि उरलेले ८ तास हे झोपेसाठी दिलेले असल्याने शरीराच्या पुनर्बांधणीसाठी उत्तम झोप घेणे आवश्यक असल्याचं विक्रम मेहेंदळे यांनी सांगितलं. रोजच्या आहारात मुद्दाम डाएट फूडचा अंतर्भाव न करता, परंपरागत पदार्थांचा आस्वाद घेतल्यास शरीर अधिक तंदुरुस्त राहण्यास मदत होईल असंही मत विक्रम यांनी मांडलं. आहार कोणता आणि कसा घ्यावा याहीपेक्षा आपण आपला आहार घेताना मनापासून त्याचा आस्वाद घेतोय का ? याचं भान ठेवत लक्षपूर्वक आणि समाधानपूर्वक अन्नग्रहण करण निरोगी आयुष्याची हमी देऊ शकेल अस विक्रम यांनी यावेळी सांगितलं. प्रेक्षकांचा प्रश्नोत्तर सत्र आणि प्रात्यक्षिकांमधला सहभाग उल्लेखनीय होता. 

      व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रात कीर्तनासारखा जुना पारंपरिक कलाप्रकार आणि ५० पेक्षा आधी पारंपरिक भारतीय वाद्य नव्या स्वरूपात तरुणांसमोर मांडणाऱ्या तरुणांचा प्रवास 'मिल्लेनिअल्स चा कारवाँ - सूर नवा साज नवा' या विषयातून उलगडला गेला. कॉर्पोरेट कीर्तनकार 'पुष्कर औरंगाबादकर' आणि ५० हुन अधिक पारंपरिक वाद्य वाजवणारा 'मधुर पडवळ' हे तरुण या सत्रासाठी पाहुणे म्हणून उपस्थित होते. या तरुणांना  प्रत्यक्ष बोलते करण्याचे काम युगांतरचे अध्यक्ष कौस्तुभ बांबरकर यांनी केले. ९ पिढ्यांपासून घराण्यात कीर्तनाची परंपरा असणाऱ्या आणि आय.आय.एम मधून व्यवसायिकतेचं शिक्षण घेतलेल्या पुष्कर औरंगाबादकर यांनी 'कोर्पोरेट कीर्तन' या नव्या संकल्पनेची गुढी उभारली. कोर्पोरेट कीर्तन हे विविध आस्थापनांच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सादर केलं जात असून देशाच्या बांधणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचं चरित्र संतांच्या रचनांमधून कथित करणं हा कॉर्पोरेट कीर्तनाचा गाभा असल्याचं पुष्कर यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलं. याशिवाय इतर कीर्तनकारांच्या शैलीचा अभ्यास हा अभ्यास म्हणून केला जात असून स्पर्धात्मक पातळीवर नेलेली कला ही लवकर लोप पावते असंही मत त्यांनी मांडलं. हरी कीर्तन, नारदीय कीर्तन, राष्ट्रीय कीर्तन अशा कीर्तन शैलींचा अभ्यास प्रात्यक्षिकांतून उलगडताना श्रोत्यांना खिळवून ठेवणारं विवेचन पुष्कर यांनी केलं. यादरम्यान मधुर पडवळ यांनी ५० पेक्षा अधिक पारंपरिक वाद्य मिळवून, शिकून ती अवगत करण्यासाठी घेतलेल्या अपरिमित कष्टांचा प्रवास विशद करताना, काही वाद्य शिकण्यासाठीचे नक्षलग्रस्त भागातले जीवावर बेतलेले अनुभवही सांगितले. एखादं पारंपरिक वाद्य शिकणं इतकच पुरेसं नसून त्या वाद्याचं व्यक्तिमत्त्व, त्याचा पोत, त्याची वाजवण्याची पद्धत आणि त्याची भाषा अवगत करणं म्हणजे ते वाद्य आपलंसं करणं असतं असं मत मधुरने मांडलं. रावणहत्ता, कर्ताल, खमुक, दरबुका अशी १३ वेगवेगळी वाद्य वाजवून,ही  वाद्य हा आपल्या देशाचा सांस्कृतिक अभिमान आहेत असाही मधुरने यावेळी सांगितलं.  

    युगांतर प्रतिष्ठानच्या युवा शिलेदारांच्या अथक आणि शिस्तबद्ध अशा आयोजनाने कार्यक्रम रंगतदार झाला. प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवत होती. दरवर्षी आरोह व्याख्यानमालेच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे विषय समाजासमोर मांडणं आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तरुणांना व्यासपीठ मिळवून देणं या दोन उद्दिष्टांची पूर्तता करणं हे आमचा मुख्य ध्येय असून त्यात यशस्वी होत असल्याचं एक तरुण संस्था म्हणून आम्हाला समाधान आहे असं मत युगांतर प्रतिष्ठानचे अध्यक्ष कौस्तुभ बांबरकर यांनी व्यक्त केलं.  

Web Title: Proper diet, adequate sleep, regular exercise, and a controlled lifestyle are important: dietitians say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.