वाढीव टप्पा अनुदानासाठी ठाण्यात मुख्याध्यापकांचे आंदाेलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 22:25 IST2025-07-11T22:25:08+5:302025-07-11T22:25:25+5:30
...येथील शासकीय विश्रामगृहासमाेर या आंदाेलनकर्त्या मुख्याध्यापकांनी तीव्र निदर्शने केली.

वाढीव टप्पा अनुदानासाठी ठाण्यात मुख्याध्यापकांचे आंदाेलन
ठाणे : विविध अध्यादेश काढून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आराेप करून या शाळांना विविध समस्या भेडसावत आहेत. या समस्या तत्काळ साेडवाव्या, वाढीव टप्पा अनुदान प्रचलित नियमानुसार देण्यात यावा, १५ मार्च २०२४ चा संच मान्यता शासन आदेश रद्द करावा आदी मागण्यांसाठी जिल्ह्यातील मुख्याध्यापक व शिक्षकांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढून त्यांच्या मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी रूपाली भालके यांना दिले.
येथील शासकीय विश्रामगृहासमाेर या आंदाेलनकर्त्या मुख्याध्यापकांनी तीव्र निदर्शने केली. महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना, शिवछत्रपती शिक्षक संघटना व मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा धडक मोर्चा काढून तीव्र निदर्शन शुक्रवारी छेडण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी यांना भेटलेल्या या आंदाेलनकर्त्यांच्या शिष्टमंडळात ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी गणेश पाटील, अनिल पाटील, प्रवीण लोंढे, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष प्रशांत भामरे, शिक्षक क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस, तसेच विलास जाधव, आनंद किंगे, भास्कर नारखेडे, किशोर राठोड, थॉमस सर, भाऊसाहेब पानसरे इत्यादी पदाधिकारी व शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,असे जेष्ठ शिक्षक दिलीप डुंबरे यांनी लाेकमतला सांगितले. यावेळी करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये वाढीव टप्पा अनुदान द्यावे, जुनी पेन्शन जशीच्या तशी लागू करावी, पवित्र पोर्टल द्वारे भरती दर सहा महिन्यांनी करावी, शिक्षकेतर भरती तातडीने करावी आणि १५ मार्च २०२४ चा संच मान्यता शासन आदेश रद्द करावा आदी मागण्यां या मुख्याध्यापक, शिक्षकांनी केल्या.