लसीचे राजकारण तापले, नगरसेवकांनीही घेतली लस; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 23:43 IST2021-02-25T23:43:18+5:302021-02-25T23:43:28+5:30
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी : सत्ताधाऱ्यांनी घेतला गैरफायदा

लसीचे राजकारण तापले, नगरसेवकांनीही घेतली लस; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
ठाणे : नियम डावलून महापौर नरेश म्हस्के यांनी कोरोनाची लस घेतल्याचा आरोप भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केल्यानंतर आपण कोणत्याही प्रकारे नियम डावलून लस घेतली नसल्याचा दावा महापौर नरेश म्हस्के यांनी केला आहे. परंतु, यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. विशेष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या काही महत्त्वाच्या नगरसेवकांनीदेखील कोरोनाची लस घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यातही आमदार रवींद्र फाटक यांच्या लहान मुलानेदेखील या लसीचा लाभ घेतल्याने यावरून राजकीय आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये २० फेब्रुवारी रोजी महापौर म्हस्के व शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी लस घेऊन फोटोसेशन केले होते. केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार कोरोनाशी युद्ध करणाऱ्या फ्रंटलाइन वर्कर्सला कोरोना लस दिली जात आहे. त्यात फ्रंटलाइन वर्कर्स व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नगरसेवक वा कोणत्याही लोकप्रतिनिधींचा यामध्ये समावेश केलेला नाही. त्यानंतरच्या टप्प्यात ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींचा समावेश केलेला आहे. असे असतानाही म्हस्के व फाटक यांनी बेकायदेशीरपणे कोरोना लस घेतल्याचा आरोप डुंबरे यांनी केला होता.
महापौर म्हस्के यांनीही मनोहर डुंबरे यांनी आपल्याकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड देऊन लसीकरणासाठी नोंदणी करण्याची मागणी केल्याचा दावा केला आहे. तसेच आम्हीदेखील कोरोना संसर्ग काळात दिवसरात्र एक करून लोकांसाठी काम केलेले आहे. काही नगरसेवकांना यामध्ये आपला जीवही गमवावा लागलेला आहे. असे असताना अशा प्रकारचे चुकीचे आरोप करणे अयोग्य असल्याचेही म्हटले आहे.