वाहतूक काेंडीतील दहावी, बारावीच्या परीक्षार्थींच्या मदतीला येणार पाेलिसांचे रायडर्स
By जितेंद्र कालेकर | Updated: February 6, 2026 18:27 IST2026-02-06T18:27:04+5:302026-02-06T18:27:27+5:30
रस्त्यावर अडचणी उद्भवल्यास वाहतुक पोलिसांच्या हेल्पलाईनवर संपर्क करा: ५४ रायडर्स सज्ज

वाहतूक काेंडीतील दहावी, बारावीच्या परीक्षार्थींच्या मदतीला येणार पाेलिसांचे रायडर्स
जितेंद्र कालेकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता यावे, यासाठी ठाणे शहर वाहतूक पाेलिसांनी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परीक्षेच्या दिवशी उशीर होणे, वाहन बिघाड, वाहतूक कोंडी आदी कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला वाहतुक पोलीस सज्ज झाले आहेत. त्यानुसार, रस्त्यांवर ५४ रायडर्स तैनात केले आहेत. वाहतूक नियंत्रण शाखेच्या व्हॉटसॲप क्रमांक आणि वाहतूक हेल्पलाईनसह १८ वाहतुक युनिटमध्ये संपर्क साधण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. परिक्षेला पोहचण्यासाठी रस्त्यावर काेणतीही समस्या उद्भवल्यास वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनवर संपर्क करण्याचे आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेचे पाेलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी शुक्रवारी केले.
ठाण्याचे पाेलीस आयुक्त आशुताेष डुंबरे आणि सह पाेलीस आयुक्त डाॅ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य माध्यमिक (दहावी) आणि उच्च माध्यमिक (बारावी) शालांत प्रमाणपत्र परिक्षा अनुक्रमे १० फेब्रुवारी आणि २० फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. या परीक्षांसाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील एक ते पाच परिमंडळांमध्ये इयत्ता बारावीची १२६ केंद्रे तर दहावीची २२३ केंद्रे आहेत. या परिक्षा केंद्रांवर परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्यांवर कोणत्याही कारणामुळे अडचण उद्भवल्यास ५४ रायडर्स सज्ज ठेवल्याची माहिती उपायुक्त शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत दिली. यासाठी विद्यार्थी अथवा पालकांनी वाहतूक विभागाच्या वाहतूक नियंत्रण हेल्पलाईन क्रमांक ८२८६ ३००३०० आणि ८२८६ ४००४०० तसेच वाहतूक नियंत्रण व्हॉटसॲप क्रमांक ७०३९००३८६६ आणि १८ वाहतुक युनिटमध्येही हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध केले आहेत. याशिवाय, नियंत्रण कक्षातही तीन वाहने तैनात ठेवली जाणार आहेत. परिक्षाकाळात रस्त्यांवरील अडचणी संबंधित माहिती मिळताच वाहतूक पोलिसांकडून तातडीने घटनास्थळी पोहचून वाहतुकीतील अडथळे दूर करीत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी मदत केली जाणार आहे. ही सुविधा केवळ परीक्षा कालावधीसाठी उपलब्ध आहे. परिक्षा कालावधीत पालकांनी तसेच, नागरिकांनीही या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाचेच्या वतीने उपायुक्त शिरसाट यांनी केले.