पोलिसाच्या हातावर तुरी, कोर्टात आलेला कैदी दुचाकीवरुन फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 22:09 IST2019-07-16T22:08:22+5:302019-07-16T22:09:43+5:30
ठाणे : ठाणे विशेष मोका न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर पुन्हा ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाकडे नेले जात असतांना नरेश फगुनमल छाब्रीया ...

पोलिसाच्या हातावर तुरी, कोर्टात आलेला कैदी दुचाकीवरुन फरार
ठाणे : ठाणे विशेष मोका न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर पुन्हा ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाकडे नेले जात असतांना नरेश फगुनमल छाब्रीया (29, रा. साईनाथ कॉलनी, उल्हासनगर) या कैद्याने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवराम चव्हाण यांच्या हाताला झटका देऊन पलायन केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पळालेल्या कैद्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
उल्हास नगरातील चोरी, दरोडा तसेच मोकांतर्गत उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या छाब्रीया याला ठाणे जिल्हा न्यायालयात मोक्का विशेष न्यायाधीशांकडे सुनावणीसाठी आणण्यात आले होते. ही सुनावणी झाल्यानंतर त्याला दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास पुन्हा ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाकडे पायी नेले जात होते. कारागृहापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या किल्ला मारुती मंदिराजवळ आल्यानंतर त्याने ठाणो शहर पोलीस मुख्यालयाचे जमादार चव्हाण यांच्या हाताला जोरदार धक्का देत तिथून जाणाऱ्या एका अज्ञात मोटारसायकलस्वाराच्या पाठीमागे बसून पलायन केले. हा मोटारसायकलस्वार आणि तो एकमेकांच्या ओळखीचे असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या घटनेनंतर ठाणे पोलीस आणि कारागृह प्रशासनाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. त्याच्या शोधासाठी ठाणे नगर पोलिसांनी दोन पथके तयार केली असून ठाणे शहर, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण या कार्यक्षेत्रतील सर्व पोलिस ठाण्यांना त्याची माहिती देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.