ठाणे : सायकली असो की शौचालय किंवा ५० चौक व परिसराचे सुशोभिकरण आदींच्या बदल्यात कंत्राटदारांवर कोट्यवधींची खैरात करणारे व महापालिकेला आर्थिकदृष्ट्या खड्ड्यात टाकणारे सर्वच जाहिरात करार रद्द करावेत, अशी मागणी भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे. १५ मोबाइल व्हॅन उभे करण्याचे हक्कही कचऱ्याच्या भावाने दिल्याचा आरोप त्यांनी केला.
पर्यावरणाच्या नावाखाली सायकल प्रकल्प सुरू करून मोक्याच्या जागा सायकल स्टॅण्डसाठी बहाल केल्या. त्यानंतर महामार्गावर शौचालये उभारण्याचे फॅड आणून जाहिरातीचे हक्क दिले गेले. स्वच्छ भारत योजनेच्या नावाखाली ५० चौक व परिसराच्या सुशोभिकरणाच्या गोंडस प्रस्तावाखाली कंत्राटदाराची बेगमी केली. त्यानंतर लालबहादूर शास्त्री मार्गावरील उड्डाणपुलाचे हक्क व्हर्टिकल गार्डनच्या नावाने दिले. या कंत्राटदारांशी करारही केला नाही. अशा परिस्थितीत महापालिका आणखी किती काळ कंत्राटदारांचे लांगुलचालन करणार आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील जाहिरातीचे हक्क देण्याबाबत गेल्या सात वर्षांत केलेल्या करारांचा आढावा घ्यायला हवा. सायकलींच्या कंत्राटदाराने अख्ख्या ठाणे शहरासाठी केवळ १७ लाख ५० हजार रुपयांच्या सायकली खरेदी केल्या. त्याबदल्यात महापालिकेने दरवर्षी तब्बल एक कोटी ८२ लाखांचा कर व कोट्यवधी रुपयांच्या जागेच्या भाड्यावर पाणी सोडले, हा कोणता व्यवहार? स्वत:च्या मालकीच्या जागा भाड्याने देताना महापालिकेचे अधिकारी असा करार करतील का, असा सवालही त्यांनी केला. १५ मोबाइल व्हॅन उभ्या करण्यासाठीची मूळ किंमत अल्प ठेवली गेली. प्रती चौरस फूट केवळ ८९ पैसे म्हणजे कचऱ्याच्या भावात जाहिरात कंपनीची तुमडी भरली गेली. तर ७५ हजार चौरस फुटांचे जाहिरात हक्क देणाऱ्या रौनक ॲव्हर्टायझिंगकडून महापालिकेला वार्षिक २५ लाख रुपये दिले जातात, याकडे लक्ष वेधले.
इकडे तिकडे बोट दाखवू नका
जाहिरातीच्या हक्कासंदर्भात आवाज उठविल्यानंतर सत्ताधारी शिवसेना व महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून इकडे तिकडे बोट दाखवून वेळ मारून नेली जाते. त्यातून केवळ वेळ काढून भ्रष्ट कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचा हेतू आहे. त्याऐवजी त्यांनी संबंधित वादग्रस्त करार रद्द करण्याची हिंमत दाखवावी, असे ते म्हणाले.