उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक, कोण आहे आरोपी?
By जितेंद्र कालेकर | Updated: January 6, 2025 18:48 IST2025-01-06T18:45:57+5:302025-01-06T18:48:11+5:30
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोशल मीडियावरून मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक, कोण आहे आरोपी?
ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समाजमाध्यमांद्वारे शिवीगाळ करत मारण्याची धमकी देणाऱ्याला श्रीनगर पोलिसांनी अटक केली. हितेश प्रकाश धेंडे (वय २६) असे आरोपीचे नाव आहे, अशी माहिती श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलजारीलाल फडतरे यांनी सोमवारी (६ जानेवारी) दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आरोपी हा शिंदे यांच्याच कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातील रहिवासी आहे. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील एका सुरक्षा रक्षकाने त्याला मारहाण केली आणि ‘हम एकनाथ शिंदेजी के आदमी है’ असे त्याला धमकावण्यात आले. त्यानंतर त्याने ही धमकी दिली. पोलीस चौकशीत त्याने या सगळ्याची कबूली दिली.
शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात उपमुख्यमंत्री शिंदे विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा सामना रंगला आहे. दोन्ही गटाच्या समर्थकांकडून एकमेकांवरोधात समाजमाध्यमांवर टिकाटिप्पणी सर्रास केली जाते.
हितेशने दुसऱ्याच्या मित्रावरून केला सगळा प्रकार
दरम्यान, रविवारी हितेश याने समाजमाध्यमांवर एक चित्रफित प्रसारित केली. यामध्ये त्याने शिंदे यांना शिवीगाळ करीत ठार मारण्याचीही धमकी दिली.
ही चित्रफित प्रसारित होताच, ठाण्यात शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. वागळे इस्टेट भागातील शिंदे सेनेचे पदाधिकारी परेश चाळके यांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (५ जानेवारी) रात्री याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात शिंदे यांना धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
चाळके यांची तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी हितेश या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. हितेश हा वागळे इस्टेट येथील वारलीपाडा भागात वास्तव्याला आहे. हा संपूर्ण परिसर शिंदे यांच्याच कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात येतो. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी हितेशचा शोध सुरू केला होता. दरम्यान, सोमवारी (६ जानेवारी) सकाळी फडतरे यांच्या पथकाने शोध घेऊन त्याला अटक केली.
शिंदेंना धमकी देणारा हितेश कोण?
हितेशचे नववीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही हाणामारीचे गुन्हे दाखल झाले आहेत. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे आई धुणी-भांडी करण्याचे काम करते. त्याच्याकडे मोबाईलही नसल्यामुळे त्याने एका मित्राचा मोबाईल कॉल करण्याच्या बहाण्याने रविवारी घेतला.
त्यावरूनच त्याने स्वत:चे इन्स्टाग्रामचे खाते सुरु केले. त्याच खात्यावर त्याने उपमुख्यमंत्री शिंदे यांना शिवीगाळ करीत मारण्याचीही धमकी दिल्याचे तपासात उघड झाले आहे.