मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 18:26 IST2025-07-09T18:15:02+5:302025-07-09T18:26:17+5:30
मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तातडीने बदली करण्यात आली आहे.

मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
Mira Bhayandar CP Transfer: मीरारोडमध्ये राठीच्या मुद्द्यावरुन दुकानदाराला झालेल्या मारहाणीवरुन व्यापाऱ्यांनी मराठी भाषिकांविरुद्ध मोर्चा काढला होता. त्यानंतर मंगळवारी मराठी भाषिकांकडून मीरारोडमध्ये मोर्चाची हाक देण्यात आली. या मोर्चात मनसे, उद्धवसेना, मराठी एकीकरण समितीसह विविध मराठी भाषिक संघटना रस्त्यावर उतरणार होत्या. मात्र या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर सर्व विरोधाला झुगारून मराठी माणसांनी मोर्चा काढला. अशातच आता मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तातडीने बदली करण्यात आली आहे. पांडे यांच्या जागी निकेश कौशिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परप्रांतीय व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चानंतर मीरा भाईंदरमध्ये मराठी मोर्चाची हाक देण्यात आली होती. मनसे, ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार होता. मात्र त्याआधीच मोर्चाला परवानगी नाकारत मराठी कार्यकर्त्यांच्या धरपकडीचे आदेश देण्यात आले. त्यामुळे मराठी भाषिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. रात्रीपासून या परिसरात पोलिसांनी आंदोलकांविरोधात कारवाई करत अनेक कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. त्यामुळे संघर्ष आणखी वाढला. मात्र पोलीस प्रशासन मोर्चा न काढू देण्यावर ठाम होतं. सर्व विरोधाला झुगारून मराठी माणसांनी मोठ्या संख्येने मोर्चाला हजेरी लावली आणि मोर्चाला सुरूवात झाली. दुसरीकडे पोलिसांनी मोर्चाला परवानगी का नाकारली? असा सवाल करत मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर आता पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी करण्यात आली.
Mira-Bhayandar Police Commissioner Madhukar Pandey transferred. Niket Kaushik to be the Police Commissioner.
— ANI (@ANI) July 9, 2025
Last week, a shopkeeper was assaulted by Maharashtra Navnirman Sena (MNS) workers for not speaking Marathi here. pic.twitter.com/XhP8Xpupsc
मुख्यमंत्री वैतागले - प्रताप सरनाईक
"मला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितले. मुख्यमंत्री पोलीस महासंचालकांशी बोलले आहेत. मुख्यमंत्री पोलीस आयुक्तांशी बोलले आहेत. मुख्यमंत्री सुद्धा वैतागले होते, पोलिसांच्या भूमिकेबद्दल. राज्य सरकारचा पोलिसांना पाठिंबा होता असे नाही. स्थानिक पातळीवर त्यांनी निर्णय घेतले, ते कुणालाही विश्वासात न घेता निर्णय घेतले. मी या शहराचा आमदार आहे. मी मंत्री आहे, माझ्याशी चर्चा करायला हवी होती. गृह खात्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला हवी होती. पण, कुणाशीच चर्चा न करता पोलिसांनी हे निर्णय घेतले, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं.