पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण (डाएट) कार्यालयातील एका अधिकान्याने कार्यालयात गैरकृत्य करून विनयभंग केल्याची तक्रार अल्पवयीन मुलीने केली. त्यानुसार पालघर पोलिस ठाण्यात केल्यानंतर अधिकाऱ्यांविरोधात पालघर पोलिस ठाण्यात 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२८ मार्च रोजी वसई तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी आपल्या बहिणीसोबत 'आजची शिक्षणपद्धती व त्याअनुषंगाने मिळणारी शिष्यवृत्ती' याची माहिती घेण्यासाठी संबंधित कार्यालयात गेली होती. त्यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याने तिला आपला संपर्क क्रमांक देत चार दिवसांनी पुन्हा येण्यास सांगितले होते. यानंतर १ एप्रिल रोजी फिर्यादी मुलगी आपल्या बहिणीसह कार्यालयात परत आली होती. माहिती घेत असताना संबंधित कर्मचाऱ्याने मनाला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य करीत आपला विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात केला आहे. यावेळी मुलीने याला विरोध करत आरडाओरडा केला. तर स्वतःचा बचाव म्हणून मुलीने कर्मचाऱ्याच्या कानाखाली मारल्याचेही समोर आले आहे.
घटनास्थळी उपस्थित इतर महिला कर्मचारी हस्तक्षेपासाठी आत आल्यावर त्यांच्यासोबतही झटापट झाल्याची माहिती आहे. यावेळी कार्यालयातील रिमोटसह अन्य साहित्य फेकणे, तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करणे या आरोपाखाली त्या मुलीविरोधातही गुन्हा दाखल झाल्याची माहिती पालघर पोलिसांनी दिली. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्राजक्ता पाटील करत आहेत. यानिमित्ताने अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विशाखा समिती आणि पालघर पोलिसांच्या समोर या प्रकरणाची चौकशी केली जाणार असून, चौकशीमध्ये अधिकारी दोषी आढळल्यास नियमाप्रमाणे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल- मनोज रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर