Palghar Crime: घरी कुणी नसताना भेटायला गेला अन् होणाऱ्या पत्नीचीच केली हत्या; पालघरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 15:04 IST2025-09-03T15:02:49+5:302025-09-03T15:04:19+5:30
हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे २२ वर्षीय आरोपीसोबत लग्न ठरलं होतं. तो तिला भेटायला गेला आणि त्यानंतर ही घटना घडली.

Palghar Crime: घरी कुणी नसताना भेटायला गेला अन् होणाऱ्या पत्नीचीच केली हत्या; पालघरमधील घटना
एका १७ वर्षीय तरुणीचे तिच्या होणाऱ्या नवऱ्यानेच हत्या केल्याची घटना समोर आली. पालघर जिल्ह्यातील जोहार तालुक्यात असलेल्या बिवलधर गावात ही घटना घडली आहे. एका पोलीस अधिकाऱ्यांने वृत्तसंस्थेला या घटनेबद्दलची माहिती दिली. २२ वर्षीय तरुणाने १७ वर्षीय तरुणीची हत्या केली.
मंगळवारी (२ सप्टेंबर) ही घटना घडली. जोहारचे पोलीस उपअधीक्षक समीर एस. माहेर यांनी सांगितले की, आरोपीचे मुलीवर प्रेम होते. त्यांचं लग्नही ठरलं होतं. २२ वर्षीय आरोपी तरुणीला भेटायला यायचा.
घरी आला अन् हत्या केली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मंगळवारी दुपारी तरुणीच्या घरी आला होता. त्यावेळी तिचे आईवडील शेतात गेलेले होते. ते दोघेच घरात होते. त्याचवेळी दोघांमध्ये वाद झाला आणि रागात त्याने तरुणीचा गळा दाबला. त्यात तिचा मृत्यू झाला.
दोघांमध्ये वाद का झाला, हे अद्याप कळू शकलेलं नाही. आरोपीने तरुणी हत्या केली आणि तो घटनास्थळावरून फरार झाला. थोड्या वेळाने काही शेजाऱ्यांनी घरात बघितलं असता, तरुणी मृतावस्थेत मिळाली. त्यानंतर याची पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिसांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीस उपअधीक्षक म्हणाले की, आरोपीचा शोध सुरू होता. बुधवारी त्याला अटक करण्यात यश आले. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.