Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 13:46 IST2025-12-14T13:45:14+5:302025-12-14T13:46:18+5:30
महाराष्ट्रातील वसईमध्ये १८ वर्षांपू्र्वी एक पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर आरोपीने मुलीची हत्या केली होती. प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांनी आरोपीला १८ वर्षानंतरही शोधून काढले.

Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
२००७ मध्ये पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये एक घटना घडली. त्यावेळी २२ वर्ष वय असलेल्या तरुणाने एका पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला. अत्याचारानंतर आरोपीने तिची हत्या केली. या घटनेनंतर आरोपी फरार झाला. पण, पोलिसांनी ठरवले, तर ते कुठून आरोपीला शोधून काढतात, त्याची प्रचिती या प्रकरणात आली आहे. पोलिसांनी १८ वर्षे चकमा देणाऱ्या या आरोपीला अटक केली. उत्तर प्रदेशात जाऊन त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
आरोपीने पाच वर्षाच्या मुलीचे आरोपीने आधी अपहरण केले होते. तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली. नंदलाल उर्फ नंदू विश्वकर्मा असे या आरोपीचे नाव आहे.
शेजारी राहणाऱ्या नंदूने अपहरण केलं अन्...
वसई पूर्वमधील सातिवालीमध्ये अवधराम चाळीत राहणाऱ्या एका दाम्पत्याच्या मुलीचे नंदलाल ऊर्फ नंदू विश्वकर्मा याने अपहरण केले होते. याच चाळीमध्ये नंदू विश्वकर्मा राहत होता. नंदूने मुलीला चॉकलेट घेऊन देतो म्हणून नेले होते.
आरोपी मुलीला घेऊन गेला. त्यानंतर तिने चिमुकलीवर अत्याचार केला आणि तिची गळा दाबून हत्या केली. या प्रकरणात १ एप्रिल २००७ रोजी मुलीच्या आईवडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून माणिकपूर पोलिसांनी भारतीय दंड संहितेतील कलम ३०२ (हत्या), कलम ३६३ (अपहरण) आणि कलम ३७६ (बलात्कार) असा गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांना खबऱ्याने माहिती दिली अन्...
जुन्या प्रकरणांचा समांतरपणे तपास करण्याचे आदेश पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी दिले होते. पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. त्याच वेळी वसई पोलिसांच्या गुन्हे शाखेला माहिती मिळाली की आरोपी उत्तर प्रदेशात राहत आहे.
नंदू हा त्यांच्या मूळ गावातच वास्तव्याला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या क्राइम डिटेक्शन यूनिट २ ने थेट उत्तर प्रदेश गाठले. १० डिसेंबर २०२५ रोजी पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील खरदौरी गावात जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या.