कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलांना झोपवले गार फरशीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 13:08 IST2026-01-12T13:08:20+5:302026-01-12T13:08:20+5:30
पालघरच्या मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार

कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलांना झोपवले गार फरशीवर
हितेन नाईक
पालघर : मासवणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आणलेल्या महिलांना शस्त्रक्रियेनंतर थंडीत चक्क उघड्या फरश्यांवर झोपविण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा आदिवासी, गरीब महिलांच्या आरोग्यप्रती किती निर्दयीपणे वागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या अनास्थेचे धिंडवडे नागपूरच्या अधिवेशनात गाजल्यानंतर त्यातून कुठलाही बोध घेण्याचे स्वारस्य ही यंत्रणा दाखवीत नसल्याचे या घटनेतून दिसून आले आहे.
कुटुंब नियोजन हे केंद्र शासनाचे एक महत्त्वाचे धोरण असून, पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवडा आयोजित करण्यात आलेला होता. २ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील २७ पुरुषांची नसबंदी करण्यात आली होती; तर दोन हजार ८४२ महिलांची नसबंदी शस्त्रक्रिया केल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, मासवन येथील आयुष्मान आरोग्य मंदिर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीवर 'आरोग्य परम धनम्' म्हणजेच आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे, असे बोधवाक्य लिहिणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने महिलांच्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना फरशीवर झोपवून त्यांच्या आरोग्याला दुय्यम स्थान दिल्याचे दिसून येत आहे
१० तास उपाशी
सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये २०२१ मध्ये दारशेत, सोनावे गावांतील ५३ महिलांना कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी आणले होते. त्यावेळी त्यांना व त्यांच्या बालकांना १० तास उपाशीपोटी ठेवले होते. त्या घटनेमुळे गरीब महिलांच्या आरोग्याप्रती जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचा निष्काळजीपणा समोर आला होता.