एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 18:30 IST2025-07-06T18:29:15+5:302025-07-06T18:30:15+5:30
प्रशासनाने हा पूल खुला केला खरा, पण यापूर्वी जी काळजी घ्यायला हवी होती, ती घेतल्याचे दिसत नाही. याशिवाय, ज्या पुढाऱ्यांनी कुठलाही गाजावाजा न करता, अत्यंत गोपनियता पाळून या पुलाचे उद्घाटन केले, त्यांनीही याकडे लक्ष दिलेले दिसत नाही...

एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या रस्त्यांपैकी एक म्हणजे कल्याण शीळ रस्ता. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी, हा कायमच वादाचा आणि चर्चेचा विषय राहत आला आहे. या मार्गावरील, गेल्या अनेक वर्षांपासून काम सुरू असलेला पलावा जंक्शन पूल अखेर शुक्रवारी प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. मात्र याची अवस्था अत्यंत बिकट आहे. हा पूल खुला झाल्यानंतर, काही वेळातच यावर दुचाकी अपघात होऊन दुचाकीस्वार पडल्याच्या घटना घडल्या. या नंतर, आता प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. काम अर्धवट असताना, पुल का खुला करण्यात आला? या अपघातांच्या घटनांनंतर तरी प्रशासनाला जाग येणार का? महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर तर हा निर्णय घेण्यात आला नाही ना, असे नाना प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केले जात आहेत.
...तर पहिल्याच दिवशी दुचाकींचे जे अपघात झाले ते टळले असते -
प्रशासनाने हा पूल खुला केला खरा, पण यापूर्वी जी काळजी घ्यायला हवी होती, ती घेतल्याचे दिसत नाही. याशिवाय, ज्या पुढाऱ्यांनी कुठलाही गाजावाजा न करता, अत्यंत गोपनियता पाळून या पुलाचे उद्घाटन केले, त्यांनीही याकडे लक्ष दिलेले दिसत नाही. खरे तर प्रशासनाने पूल खुला करण्यापूर्वी काळजी घेतली असती आणि उद्घाटन करणाऱ्या पुढाऱ्यांनी तो खुला करण्यायोग्य आहे की नाही, याची शहानिशा केली असती, तर पहिल्याच दिवशी दुचाकींचे जे अपघात झाले ते टळले असते.
अशा रस्त्यावरील अपघातांपेक्षा वाहतुककोंडी परवडली -
या पुलाची अवस्था अत्यंत बिकट आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कच आणि बारीक खडी दिसत आहे. पाऊस पडला की, उतारावरच रस्ता निसरडा होत आहे. यामुळे वाहने स्लीप होऊन मोठ्या अपघातांचीशी शक्यता नाकारता येत नाही. महत्वाचे म्हणजे, या पुलाचे काम अर्धवट असताना तो खुला करणे महत्वाचे होते की, लोकांचा जीव महत्वाचा आहे? असा प्रश्न उपस्थित करत, अशा रस्त्यावरील अपघातांपेक्षा वाहतुककोंडी परवडली, असे प्रवासी म्हणत आहे. एवढेच नाही तर, चोवीस तासांच्या आतच या पूलाची अशी अवस्था असेल, तर एक वर्षानंर कशी स्थिती असले? असा प्रश्नही प्रवासी विचारत आहेत. यामुळे आता तरी प्रशासनाला जाग येणार का? लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती होऊन प्रवाशांची समस्या सुटणार का? हे बघावे लागेल.
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video#PalavaBridge#thane#Accidentpic.twitter.com/zzmLhvaPmp
— Lokmat (@lokmat) July 6, 2025
पूल खुला केला, पण वाहने स्लीप होऊ लागली... -
तत्पूर्वी, एरवी प्रत्येक उद्घाटनाचा गाजावाजा करणाऱ्या सत्ताधारी पक्षाने पलावा पुलाचे उद्घाटन करताना काहीसा सस्पेन्स राखला होता, शुक्रवारी सकाळच्या सुमारास शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि काही निवडक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला. मात्र, यावरून वाहने स्लीप होऊ लागले. यामुळे दुपारच्या वेळी हा पुल बंद करण्याचीही वेळ आली होती.