९०९ अवैध बांधकामांपैकी १७५ बांधकामे जमीनदोस्त; ठाणे महापालिकेची उच्च न्यायालयाला माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 13:36 IST2025-08-19T13:35:43+5:302025-08-19T13:36:19+5:30

बेकायदा बांधकामप्रकरणी एमआरटीपी कायद्याअंतर्गत ४४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Out of 909 illegal constructions, 175 have been demolished; Thane Municipal Corporation informs the High Court | ९०९ अवैध बांधकामांपैकी १७५ बांधकामे जमीनदोस्त; ठाणे महापालिकेची उच्च न्यायालयाला माहिती

९०९ अवैध बांधकामांपैकी १७५ बांधकामे जमीनदोस्त; ठाणे महापालिकेची उच्च न्यायालयाला माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभागांत ९०९ बांधकामे अनधिकृत असल्याची माहिती ठाणे महापालिकेने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली. या बेकायदा बांधकामांपैकी १७५ बांधकामे पूर्णपणे निष्कासित करण्यात आली आहेत, ५२ बांधकामे अंशतः निष्कासित करण्यात आली आहेत, तर अशी माहिती ठाणे महापालिकेने न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

बेकायदा बांधकामप्रकरणी एमआरटीपी कायद्याअंतर्गत ४४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच एकंदर २२७ बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून, उर्वरित बांधकामांचे पाडकाम प्रगतिपथावर आहे, असेही पालिकेच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. गणेशोत्सव येत असल्याने पोलिस बंदोबस्तात व्यग्र असतील. त्यामुळे पुढील कारवाई गणेशोत्सवानंतरच करू, अशी ग्वाही पालिकेने न्यायालयाला दिली.

शीळ फाटा येथील २१ इमारती बेकायदा असूनही पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले, अशी तक्रारवजा याचिका रहिवासी सुभद्रा टकले यांनी दाखल केली आहे. त्यावरून न्यायालयाने पालिकेला संबंधित २१ इमारतींवर कारवाईचे आदेश दिले.  तसेच, ठाण्यात अनेक बेकायदा बांधकामे असल्याचे निरीक्षण नोंदवीत पालिकेला बेकायदा बांधकामांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते. त्यानुसार, पालिकेने नऊ प्रभागांचे सर्वेक्षण करून प्रतिज्ञापत्र दाखल केले.

दोषींवर कारवाई

२१ बेकायदा बांधकामे उभी राहण्यास मदत करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याचबरोबर  नऊजणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, काही जणांची बदली केल्याचेही प्रतिज्ञा पत्रात नमूद केले आहे.

साडेचार कोटींच्या खर्चाची बिल्डरांकडून वसुली

२१ बांधकामे पाडण्यासाठी साडेचार कोटींहून अधिक रुपयांचा खर्च आला. हा पैसा संबंधित विकासकांकडूनच वसूल करण्यात येईल, अशी माहिती ठाणे पालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी यांनी खंडपीठाला दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणात इमारतींवर कारवाई करत असताना एकही विकासात पुढे येऊन कारवाई थांबवण्याची विनंती केली नाही, याचे आश्चर्य वाटत असल्याचे कुंभकोणी यांनी नमूद केले.

बेकायदा बांधकांची संख्या

  • नौपाडा कोपरी    १०
  • वागळे    ७
  • लोकमान्य - सावरकर नगर    १६
  • वर्तकनगर    १४
  • माजिवडा मानपाडा    ३४
  • उथळसर    १४
  • कळवा    ४२
  • मुंब्रा    ३२
  • दिवा    ७४०

Web Title: Out of 909 illegal constructions, 175 have been demolished; Thane Municipal Corporation informs the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.