One in Thane, two patients in KDMC; The total number of corona are 35 | ठाण्यात एक, केडीएमसीत दोन रुग्ण; एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३५

ठाण्यात एक, केडीएमसीत दोन रुग्ण; एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३५

ठाणे / कल्याण : कळव्यातील साईबाबानगर परिसरात आढळलेल्या ५९ वर्षीय कोरोना रुग्णाने प्राथमिक उपचार कळव्यातील एका खासगी रुग्णालयात घेतल्याने महाापालिकेने ते रुग्णालयच सील केले आहे. या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना तेथेच क्वारंटाइन केले असून नेमके किती जण आहेत याची माहिती मिळू शकलेली नाही. दुसरीकडे, ठाण्यात शुक्रवारी आणखी तीनरुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे ठाण्यातील रुग्णांची संख्या ही १६ वर गेली आहे.

दरम्यान, कल्याण-डोंबिवली क्षेत्रात दोन नवे रुग्ण सापडल्याने येथील संख्या २१ झाली आहे. या दोन्ही शहरांतील रुग्णांची संख्या ३७ झाली आहे. मुंब्रा येथील अमृतनगर भागातील ४७ वर्षीय, तसेच ठाण्यातील धोबीआळी येथील ५७ वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती राहत असलेली इमारत पालिकेने क्वारंटाइन केली आहे.

गुरुवारी पुन्हा एकदा दोन रुग्णांची भर पडली आहे. काजूवाडी परिसरात एका खासगी दवाखाना असलेल्या वैद्यकीय सेवा देणाºयालाच कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्या संपर्कातील रुग्णांचा शोध सुरूआहे. दुसरीकडे कळव्यातील साईबाबानगरमध्ये ज्या वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे, त्याने जवळच्याच एका खासगी रुग्णालयातच प्राथमिक उपचार घेतले होते. ३० आणि ३१ मार्चला तो याच रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये आला होता, अशी माहिती प्रशासनाने दिली.

खबरदारी म्हणून प्रशासनाने ते रुग्णालय सील केले आहे. कळव्यातील हे सर्वात जुने रुग्णालय असून या ठिकाणी ओपीडीसाठी मोठी गर्दी होते. आता या रु ग्णांच्या संपर्कात आलेले ओपीडीमधील इतर रु ग्ण, तसेच ज्या डॉक्टरांनी या रु ग्णाला तपासले आहे त्यांच्याही संपर्कात आलेले इतर रु ग्ण या सर्वांचा शोध घेण्याचे आव्हान आता प्रशासनासमोर आहे.

ठाण्यात गुरुवारी एक वैद्यकीय अधिकारी आणि एका वृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर शुक्रवारी यात आणखी एका रुग्णाची भर पडली आहे. लोढा पॅरेडाइज परिसरात राहणाºया एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या या रु ग्णावर मुंबईच्या एका खासगी रु ग्णालयात उपचार सुरू आहेत.

कल्याण-डोंबिवलीत २१ रुग्ण; हळदी समारंभात लागण

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत शुक्रवारी कोरोनाचे आणखी दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिका हद्दीत कोरोनाबाधितांची संख्या २१ झाली आहे. दरम्यान, गुरुवारी पाच नवे रुग्ण आढळले होते. दिवसेंदिवस रुग्णांची
संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दोन रुग्णांपैकी एक जण कल्याण पश्चिमेतील तर, दुसरा डोंबिवली पूर्वेतील आहे. गुरुवारच्या पाच रुग्णांपैकी चार रुग्ण डोंबिवली पूर्वेतील तर, एक जण कल्याण पूर्वेतील आहे. चार रुग्णांपैकी तीन रुग्ण हे डोंबिवलीतील हळदी व लग्न सभारंभात हजेरी लावणाऱ्यांच्या संपर्कातील आहेत. एक रुग्ण हा कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने त्याला लागण झाली आहे.

कल्याणमध्ये सगळ्यात प्रथम सापडलेले कोरोनाबाधित रुग्ण व त्यांचे दोन कुटुंबीय बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात पुनर्तपासणीअंती घरी सोडलेल्या रुग्णांची संख्या चार आहे. महापालिकेने डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय हे आयसोलेशन रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. महापालिकेतील कोरोना संशयित रुग्णांना तेथे दाखल करणार आहे.

नवी मुंबईमध्ये एकाच दिवशी वाढले नऊ रुग्ण

नवी मुंबई : नवी मुुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून गुरुवारी एकाच दिवशी नऊ रुग्ण आढळले असून एकूण आकडा २२ झाला आहे. वाशीमध्ये सर्वाधिक रुग्ण असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणाºया शहरांमध्ये नवी मुंबईचाही समावेश होऊ लागला आहे. गुरुवारी एकाच दिवशी ९ रुग्ण आढळले असून यात सात रुग्ण वाशीमधील एकाच कुटुंबामधील असून उरलेले दोन नेरूळमधील आहेत. नेरूळमध्येही एकाच कुटुंबामधील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या परिवारातील अजून एकाचा अहवाल अद्याप आलेला नाही.

फिलिपाइन्सवरून आलेल्या काही नागरिकांनी वाशीमधील धार्मिक स्थळामध्ये मुक्काम केला होता. त्यामधील एकाला कोरोनाची लागण झाल्याचे १४ मार्चला निदर्शनास आले. त्या व्यक्तीमुळे आठ जणांना लागण झाली होती. शहरातील २२ रुग्णांपैकी १५ जण वाशीमधील आहेत. पाच नेरूळ व सीवूडमधून असून उर्वरित कोपरखैरणे व ऐरोलीमधील आहेत.

आतापर्यंत सापडलेल्या रुग्णांनी पंधरा दिवसांमध्ये कुठे प्रवास केला, त्यांच्या सान्निध्यात कोण आले याची माहिती घेऊन संबंधितांचेही क्वारंटाइन केले जात आहे. रुग्ण आढळलेल्या सर्व इमारती सील केल्या असून त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. या परिसरातील ५०० घरांचे नियमित सर्वेक्षण करण्यासही सुरुवात केली आहे.

एपीएमसीत व्यवहार सुरळीत

एमपीएमसीतील व्यवहार गुरुवारीही सुरळीत सुरू होते. येथील पाच मार्केटमध्ये ४५५ वाहनांमधून कृषी माल विक्रीसाठी आला आहे. यामध्ये भाजी मार्केटमध्ये ११५, कांदा मध्ये ४७, फळ मार्केटमध्ये २५९, मसाला मार्केटमध्ये ३४ वाहनांची आवक झाली आहे. भाजीपाल्याची १९४ वाहने एपीएमसीमध्ये न येता थेट मुंबईमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती बाजारसमिती प्रशासनाने दिली.

अफवांचा पाऊस

नऊ रुग्ण आढळल्यानंतर समाज माध्यमांवरून अफवांचा पाऊस पडू लागला होता. पोलीस आयुक्तांच्या नावाने नागरिकांना घाबरविण्यास सुरुवात झाली आहे. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पुढील सूचना मिळेपर्यंत असोसिएशनचा गेट सकाळी दहा ते सायंकाळी ६ पर्यंत बंद करण्यात येत आहे.

Web Title: One in Thane, two patients in KDMC; The total number of corona are 35

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.