अंबरनाथमध्ये एक श्रद्धेचे, दुसरे कलेचे मंदिर: अशोक सराफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 08:22 IST2025-10-20T08:21:51+5:302025-10-20T08:22:37+5:30
कलाकारांच्या उपस्थितीत नाट्यगृहाचे लोकार्पण

अंबरनाथमध्ये एक श्रद्धेचे, दुसरे कलेचे मंदिर: अशोक सराफ
लोकमत न्यूज नेटवर्क, अंबरनाथ : अंबरनाथ शहर हे हजार वर्षे पुरातन अशा शिव मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. अंबरनाथमध्ये साकारलेल्या नाट्य मंदिरामुळे पुन्हा एक नवी ओळख मिळणार आहे. अंबरनाथमधील प्राचीन शिव मंदिर हे श्रद्धेसाठी आणि आनंद दिघे नाट्यमंदिर हे कलेचे मंदिर म्हणून भविष्यात नावारूपाला येईल, असा विश्वास पद्मश्री ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केला.
अंबरनाथ नगरपालिकेने उभारलेल्या नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा रविवारी ज्येष्ठ अभिनेते सराफ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, अलका कुबल, विजय पाटकर, विशाखा सुभेदार, संतोष जुवेकर उपस्थित होते.
लोकार्पण सोहळ्यानंतर सराफ यांनी अंबरनाथकरांना हे नाट्यगृह स्वच्छ ठेवण्याचा सल्ला दिला. भविष्यात याच नाट्य मंदिरात नाटक पाहण्यासाठी मी स्वतः येईन, अशी ग्वाही दिली.
‘नाट्यगृह कलेचा वारसा जपतील’
खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून हे नाट्य मंदिर उभारण्यात आले आहे. आनंद दिघे यांच्या नावाने उभारण्यात आलेले हे नाट्यगृह कलेचा वारसा जपेल, हे नाट्यगृह कलाकारांना ऊर्जा देणारे ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. विकासाच्या कामामध्ये विरोधकही सोबत असल्यावर विकास कसा घडतो, याचे उदाहरण म्हणजे अंबरनाथ शहर असल्याचेही शिंदे म्हणाले. नाट्यगृहाच्या रंगमंचावरून एकनाथ शिंदे यांनी विनोदी स्वरूपात विरोधकांना टोला लगावला.