भिवंडी: राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आता भिवंडी आणि भिवंडी परिसर आला असून, वर्षभरात तालुक्यातील बोरीवली पडघा येथे झालेल्या कारवाईनंतर गुरुवारी पहाटे शहरालगतच्या खोणी खाडीपार ग्रामपंचायत ठिकाणी एन आय ए ने दहशतवादी संघटनांसोबत संपर्कात असल्याच्या संशयातून केलेल्या कारवाईत एकाला ताब्यात घेतले आहे. कामरान अन्सारी वय ४५ असे या संशयिताचे नाव आहे. मूळचा मालेगाव येथील असलेला कामरान हा या परिसरातील डोंगरकर ट्रस्टच्या मालकीच्या इमारतीत कुटुंबीयांसह राहत होता.कामरान हा मुस्लिम धार्मिक जमात मध्ये नेहमी जात असे पण नक्की कोणते काम करायचा या बाबत माहीत नसल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.एन आय ए पथकाने ही कारवाई पहाटे छापेमारी करीत केली आहे.या कारवाईने खोणी परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिक निजामपूर पोलिसां कडून या बाबत कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान एन आय ए पथकाने दहशतवादी कृत्य करणाऱ्या संघटनांच्या संपर्कात कामरान असल्याच्या संशयावरून त्यास ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे.
भिवंडीतील खाडीपार येथे एनआयएची कारवाई; एक संशयित ताब्यात
By नितीन पंडित | Updated: December 12, 2024 20:43 IST