Movement to expel BJP thane municipal corporation | भाजपाला हद्दपार करण्याच्या हालचाली
भाजपाला हद्दपार करण्याच्या हालचाली

- अजित मांडके 
ठाणे : राज्यात महाशिवआघाडीचे सरकार आता स्थापन होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यानुसार, आता ठाणे महापालिकेतही येत्या काळात हीच समीकरणे रुजू पाहत असून त्याची झलक नुकत्याच झालेल्या महासभेत दिसून आली आहे. विशेष म्हणजे राज्याची समीकरणे जुळवताना ठाणे पॅटर्न राबवला जाणार असून आता तोच येत्या काळात ठाणे जिल्ह्यातही राबवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या समीकरणात शिवसेना, राष्टÑवादी, काँग्रेस आणि मनसेलाही बढती मिळणार असल्याची चर्चा आहे.
राज्यात आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी समीकरणे जुळत आली आहेत. त्यानुसार, येत्या काळात हीच समीकरणे महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकांत जुळण्याची चिन्हे आहेत. ज्याज्या पातळीवर भाजप आहे, त्यात्या ठिकाणावरून त्यांना हद्दपार करण्यासाठी ही महाशिवआघाडी खुली केल्याचीही चर्चा आहे.
ठाणे महापालिकेतही आता ही समीकरणे रुजण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे महापालिकेत सध्या एकहाती शिवसेनेची सत्ता आहे. तर, राष्ट्रवादी विरोधी बाकावर आहे. भाजप सत्तेत नसली तरी आतापर्यंत कुरघोडीचे राजकारण त्यांच्याकडून सुरू होते. मध्यंतरी, सत्तेत सहभागी होण्यासाठीही त्यांच्या हालचाली होत्या. मात्र, शिवसेनेने त्यांना लांबच ठेवले आहे. परंतु, असे असले तरी महापालिकेत मैत्रीपूर्ण संबंध या दोनही पक्षांत दिसत होते. मात्र, आता राज्यातील समीकरणे बदलली असल्याने त्याचे पडसाद ठाणे महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या महासभेत दिसले. सोमवारी झालेल्या महासभेत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांनी आधीच बैठक घेऊन भाजपला एकाकी पाडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, महासभेतही तेच चित्र दिसून आले. त्यामुळे भाजपची मंडळी हवालदिल झाल्याचे दिसले. येत्या दोन वर्षांच्या काळात जरी राष्ट्रवादी ही विरोधी बाकावर राहणार असली, तरी खरा विरोधक म्हणून भाजपच काम करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
।भाजपचे अवसान गळाले
एकीकडे राज्यातील निवडणुकीत यश मिळविल्यानंतर भाजपने ठाणे महापालिकेवर लक्ष केंद्रित केले होते. याची रणनीतीही या निवडणुकीआधीच ठरविण्यात आली असून त्यानुसार पक्षातील अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविली होती. शिवाय, शिवसेनेला अडचणीत कसे आणायचे, कोणते मुद्दे लावून धरायचे, मतदारांपर्यंत कसे पोहोचायचे, याची सर्व गणिते निश्चित झाली होती. याकामी महापालिका प्रशासनालाही हाताशी धरण्याचे प्रयत्न सुरू होते. एकूणच पुढील दोन ते अडीच वर्षांत याच रणनीतीवर महापालिकेवर कमळ फुलवायचे निश्चित झाले होते. परंतु, आता महाशिवआघाडीच्या नव्या समीकरणामुळे भाजपचे अवसान आतापासूनच गळाल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोणती रणनीती आखायची, कशी पावले उचलायची, याचा अभ्यास आता या पक्षाकडून सुरू झाला आहे. तर, महाशिवआघाडीकडून भाजपला सर्व स्तरांतून कसे मागे टाकायचे, यासाठीचे आडाखे बांधले जाऊ लागले आहेत. याशिवाय, ही महाशिवआघाडी येत्या काळात कायम राहिली, तर २०२२ मध्ये होणाºया ठाणे महापालिकेच्या निवडणुकीतही तसे पडसाद उमटण्याची शक्यता असून तसे झाले तर शिवसेनेबरोबर सत्तेची चव चाखण्यासाठी मागील अनेक वर्षे वाट पाहणाºया राष्टÑवादीचेही स्वप्न यानिमित्ताने साकार होईल, असे सध्या तरी चित्र आहे.

Web Title: Movement to expel BJP thane municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.